पेण प्रतिनिधी
पेण तालुक्यातील कळवे गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा रस्ता नसल्याने तसेच पाणी निचऱ्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावर तब्बल १ ते २ फूट पाणी साचत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गणपती कारखान्यांमध्ये रस्त्यापेक्षा उंच भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून संपूर्ण पाणी रस्त्यावर साचत आहे. परिणामी हा रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे.
या समस्येमुळे गावातील शालेय विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, वाहनचालक तसेच परिसरातील गणपती कारखानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीवर परिणाम होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच प्रशासनातील अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
