अमरावती | प्रतिनिधी :
सुरेशबाबा विद्यालय, फुबगाव येथील सहाय्यक शिक्षक देवानंद भजनदास पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त यश पॅलेस, अमरावती येथे सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. यू. फुलझेले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जगदीश गोवर्धन, अनिल वानखडे आणि प्रा. सीमाताई मेश्राम उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात एस. यू. फुलझेले यांनी आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे चळवळीला गतिमानता मिळत असल्याचे सांगत, देवानंद पाटील हे सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक व परिवर्तनवादी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रा. जगदीश गोवर्धन, अनिल वानखडे आणि प्रा. सीमाताई मेश्राम यांनी देवानंद पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक कार्याचा गौरव केला.
मनोगत व्यक्त करताना देवानंद पाटील यांनी भगवान बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मानवतावादी विचारांचा प्रचार-प्रसार सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच **’शब्दास्त्र विचार मंच’**च्या माध्यमातून परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून नव्या पिढीला आंबेडकरी साहित्य आणि विचारांशी जोडण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक प्रवीण कांबळे, शब्दास्त्र प्रमुख, संयोजक विद्रोही अविनाश गोंडाणे, पद्माकर मांडवधरे, सिद्धार्थ गोंडाणे आणि अनिल पाटील यांनी देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनीही त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भोयर यांनी केले, सूत्रसंचालन अरुण भोयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शशांक पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
