बांबवडे | प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील कानसा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलेले कांडवण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. या आनंददायी घडामोडीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कानसा खोऱ्यातील शेतीला वर्षभरासाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, या उद्देशाने तत्कालीन आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नांतून सन २००० मध्ये कांडवण धरणाची उभारणी करण्यात आली होती. आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्या प्रयत्नांचे फलित पुन्हा एकदा दिसून आले आहे.
धरणातील मुबलक पाणीसाठ्याचा लाभ कांडवण, मालगाव, विरळे, जांबूर, पळसवडे, थावडे, सोंडोली आणि मालेवाडी या गावांतील शेकडो एकर शेतीला होणार आहे. त्यामुळे खरीप तसेच पुढील हंगामातील सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार असून, पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. समाधानकारक पावसामुळे धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


