कडेगाव | प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील काही हॉटेल, चहा स्टॉल, पानपट्ट्या तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत. काही ठिकाणी अस्वच्छता, कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री तसेच आवश्यक परवान्यांचे पालन होत नसल्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कडेगाव तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या मते, ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेची नियमित तपासणी होणे अत्यावश्यक आहे. विशेषतः हॉटेल, चहा स्टॉल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी संबंधित विभागाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होतील, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
