बार्शी टाकळी | प्रतिनिधी :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ तसेच वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवत बार्शी टाकळी तालुक्यातील कापशी येथे गुरुवारी (दि. २३ जुलै) ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती शांततापूर्ण मार्गाने नियंत्रणात आणली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

