पिंपरी, दि. २४ जुलै २०२६ | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेत प्रत्यक्ष भेट देत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ३० जुलै २०२६ रोजी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माहितीनुसार, आयुक्तांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक मंगळवार आणि गुरुवार सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भेटीची व्यवस्था जाहीर केली होती. मात्र, या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष भेट मिळत नसल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. त्यामुळे विविध कामांसाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही निराश होऊन परतावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, आयुक्तांनी नागरिकांच्या भेटीची व्यवस्था नियमित आणि पारदर्शक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात नागरिकांनी प्रशासनाला लेखी निवेदन देत ३० जुलै २०२६ रोजी आयुक्त कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे. आंदोलनाद्वारे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी आणि ठरवून दिलेल्या वेळेत नागरिकांना प्रत्यक्ष भेट मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते गणेश दशरथ अवचिते, सचिन उद्धव शिंदे, अमोल तिरमारे, किशोर शिवाजी तेलंग, रमेश मोहन सांगडे यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्राची प्रत २३ जुलै रोजी आयुक्त कार्यालयात अधिकृतपणे सादर करण्यात आली असून, आता महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


