
कडेगाव | प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील चिंचणी (वांगी) गावातील प्रमुख बाजारपेठेतून जाणाऱ्या प्रजिमा क्र. १८ (MDR-18) मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, कडेगाव येथील उपअभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिंचणी (वांगी) हे तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून येथे महावितरण कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, शासकीय वसतिगृह, विविध बँका, शाळा तसेच अनेक शासकीय व खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका आणि विविध वाहनांची वर्दळ असते.
मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अर्जदार अविनाश अरविंद माने आणि कुलदीप सर्जेराव औताडे यांनी प्रशासनाला १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू होणार असल्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली आहे.
मागणीची पूर्तता न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६, स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालय, चिंचणी (वांगी) समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे.
