
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथील सुपुत्र तथा जरीमरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय दळवी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त कल्याण येथील मातोश्री र. गा. विद्यालयात विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन दळवी सरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
यावेळी इयत्ता सातवीतील कु. साक्षी बिजले हिने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा ओघवत्या शैलीत परिचय करून देत उपस्थितांची मने जिंकली, तर कु. अंकिता ठुबे हिने लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्याचा आढावा घेतला. यश शिंदे याने मनोगत व्यक्त केले. तसेच स्वरा भालेराव, समृद्धी डोके, प्रीती जाधव, मनस्वी गोसावी आणि विभा सरोलकर या विद्यार्थिनींनी दत्तात्रय दळवी यांची मुलाखत घेत कार्यक्रमात वेगळी रंगत आणली.
दळवी सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले. आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असा प्रेरणादायी संदेश दिला.
जरीमरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य दत्तात्रय दळवी करत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.
या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी संतोष लगड, संतोष खामकर, जरीमरी शिक्षण संस्थेच्या संचालिका मीरा दळवी, मुख्याध्यापक तेली सर, संस्थेचे शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागाशी नाळ कायम ठेवत कल्याणमध्ये शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या दत्तात्रय दळवी यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
