अहमदपूर | प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दगडवाडी (केंद्र साताळा) येथे कार्यरत उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षिका सौ. मिनाक्षी निवृतीराव मोरे (पलमटे) यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सेवापूर्ती गौरव, निरोप समारंभ आणि सत्कार सोहळा शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विश्वनाथ नामदेव मुंढे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शिवकन्याताई गोडभरले, जिल्हा परिषद सदस्या प्रतिक्षा गुट्टे, पंचायत समिती उपसभापती अयोध्या केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, पंचायत समिती सदस्या सुरेखाताई मुंढे यांच्यासह अनेक मान्यवर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. मिनाक्षी मोरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. २०२३ मध्ये दगडवाडी शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पालकांशी संवाद साधून जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास वाढवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेची विद्यार्थीसंख्या १० वरून २२ पर्यंत वाढली. त्यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी, गीते, नृत्य, देशभक्तीपर उपक्रम आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीद्वारे शिक्षणाची गोडी लावली.
गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्येही त्या सक्रिय सहभागी होत असल्याने ग्रामस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या प्रेमळ स्वभाव, समर्पित कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचा उपस्थितांनी विशेष उल्लेख केला.
सुमारे ५८ वर्षांचे वय पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, शिक्षक, वकील, पोलीस, सैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातही त्यांनी देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिक पतीची जबाबदारी सांभाळत शिक्षकी सेवेचे कर्तव्य निष्ठेने पार पाडले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ आणि पाहुण्यांसाठी महाप्रसाद व गावजेवणाचे आयोजन करण्यात आले. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दगडवाडी ग्रामस्थ, युवक मंडळ तसेच शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
