युवानेते करण एंड्रलवार यांच्या हस्ते शुभारंभ; मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती
किनवट : अभिनेता, दिग्दर्शक तथा निर्भीड आणि परखड संपादक लक्ष्मीकांत मुंडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालयाजवळील काळे कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मराठीबाणा न्यूज लाईव्ह’च्या जनसंपर्क कार्यालयाचे शिवसेना युवा नेते करण एंड्रलवार यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या लक्ष्मीकांत मुंडे यांनी आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. सत्य, वस्तुनिष्ठता आणि परखड पत्रकारितेची भूमिका जपत त्यांनी किनवट तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पत्रकारितेसोबतच अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातूनही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला असून, जनसामान्यांमध्ये ते आपुलकीने ‘मुंडे सरकार’ म्हणून परिचित आहेत.
अल्पावधीतच ‘मराठीबाणा न्यूज लाईव्ह’ या डिजिटल माध्यमाने स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत वस्तुनिष्ठ, सत्याधारित आणि जनतेच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या बातम्यांमुळे वाचक-प्रेक्षकांचा विश्वास संपादन केला आहे. नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या, सूचना आणि विविध सामाजिक प्रश्न थेट मांडण्यासाठी अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात युवानेते करण एंड्रलवार यांच्या हस्ते फित कापून ‘मराठीबाणा’ जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर केक कापून लक्ष्मीकांत मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, हार-तुरे व शुभेच्छांचा वर्षाव करत मुंडे यांना दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह तालुक्यातील नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. वाढदिवस आणि कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने काळे कॉम्प्लेक्स परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
जनतेच्या प्रश्नांसाठी निर्भीड लेखणी आणि जनसंपर्कासाठी नवे दालन, या दुहेरी भूमिकेत ‘मराठीबाणा’च्या नव्या संपर्क कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, आगामी काळात हे कार्यालय जनसामान्यांच्या आवाजाचे प्रभावी केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







