श्रीक्षेत्र माहूर : कुंदन तिवडकर
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ दि. १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या नियोजनासाठी माहूर येथे दि. २ सप्टेंबर रोजी हॉटेल आदिशक्ती येथे मातंग समाजबांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत किनवटचे माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली.
“आरक्षणाच्या बाबतीत आजवर मोठ्या भावाने समता, न्याय आणि बंधुतेच्या भावनेने काम केले असते, तर आम्हाला आमच्या लेकराबाळांसाठी मोर्चा काढण्याची वेळ आली नसती. आम्ही कुणाचा हक्क हिरावून घेत नाही; आम्ही आमचा हक्क मागत आहोत. त्यामुळे मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये,” असे प्रतिपादन के. मूर्ती यांनी केले.
बैठकीत नारायण सांगळे, गंगाधर तोटरे, मारुती गोटमुकले, नारायणराव माडपेल्लीवार, देवानंद भांडवले यांच्यासह समाजबांधवांनी उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना के. मूर्ती म्हणाले की, “१९८७ पासून २०२३ पर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून एका मोठ्या घटकाला मोठा लाभ मिळाला. आता मातंग समाजातील मुलेही मोठ्या संख्येने सुशिक्षित झाली आहेत. त्यांना पुढे जाण्याची आणि विकासाची संधी मिळणे गरजेचे आहे. वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा केला असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे शासनाने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करावी.”
उपवर्गीकरणाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच तेलंगणा राज्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केल्याचा दाखला देत महाराष्ट्र शासनानेही याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
“आमचे भांडण समाजाशी नाही, शासनाशी आहे”
दरम्यान, मातंग समाजाचा मोठा भाऊ मानल्या जाणाऱ्या बौद्ध समाजातील काही नेत्यांकडून उपवर्गीकरणाच्या मागणीवर होत असलेल्या असभ्य टीकेबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी के. मूर्ती यांनी स्पष्ट केले की, “आमचा कुणालाही विरोध नाही. आमचे भांडण शासनासोबत आहे. सामाजिक बंधुभाव कायम ठेवून आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचे आहे.”
बैठकीदरम्यान मातंग समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. दि. १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे, तसेच “घराला कुलूप लावून” मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन के. मूर्ती यांनी केले.
बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल माडपेल्लीवार, देवानंद भांडवले, मिलिंद चांदणे, दत्ता आठवले, गजानन जोगदंड, तुषार आमटे, ज्ञानेश्वर पतंगे, इंद्रजीत नेवारे, भीमाशंकर सूर्यवंशी, आकाश पतंगे, दशरथ उबाळे, गणेश लोंढे, किरण टाकळीकर, सतीश उमाप, कमलेश जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.










