
CEIR पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तीन वर्षांतील गहाळ मोबाईलचा शोध
करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन वर्षांत गहाळ झालेल्या तब्बल २८ मोबाईल फोनचा शोध घेण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. सुमारे ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४, २०२५ आणि २०२६ या कालावधीत विविध नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली.
या पथकाने CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या तांत्रिक मदतीचा वापर करून गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण २८ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले.
शोधण्यात आलेल्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत ६ लाख ३० हजार रुपये आहे. करमाळा पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते संबंधित २८ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. नागरिकांनी करमाळा पोलिसांचे आभार मानले.
या मोहिमेत CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस कर्मचारी स्वप्नील शेरखाने, प्रकाश जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोनावणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गहाळ मोबाईलची तातडीने तक्रार नोंदवा : पोलीस निरीक्षक रणजीत माने
मोबाईल गहाळ झाल्यास नागरिकांनी विलंब न करता आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात संपूर्ण कागदपत्रांसह तक्रार नोंदवावी. मोबाईलची खरेदी पावती आणि IMEI क्रमांक उपलब्ध असल्यास तपासासाठी मोठी मदत होते. तक्रार लवकर प्राप्त झाल्यास तांत्रिक माध्यमातून मोबाईलचा शोध घेणे अधिक सुलभ होते, असे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले.
सायबर सुरक्षिततेसाठी पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, फोटो, बँकिंग तपशील आणि महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यामुळे नागरिकांनी पुढील बाबींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- अनोळखी व्यक्तींना OTP, PIN, पासवर्ड किंवा UPI PIN देऊ नये.
- मोबाईलला नेहमी स्क्रीन लॉक किंवा पासवर्ड ठेवावा.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद APK फाईल किंवा ॲप डाउनलोड करू नये.
- बँकिंगशी संबंधित माहिती फोनवरून कोणालाही देऊ नये.
- सार्वजनिक Wi-Fi चा वापर करून संवेदनशील किंवा बँकिंग व्यवहार करणे टाळावे.
- मोबाईल हरवल्यास तातडीने संबंधित दूरसंचार कंपनीशी संपर्क साधून SIM बंद करावे.
- बँकेशी संपर्क साधून संबंधित बँकिंग सेवा सुरक्षित करावी.
“सावध राहा, सुरक्षित राहा – तुमचा मोबाईल आणि तुमची माहिती दोन्ही जपा!” असा संदेश करमाळा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.
