
“मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पायेगा” म्हणत सरकारविरोधात आंदोलन; विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची मागणी
लातूर : प्रतिनिधी
वर्षानुवर्षे घोषणा होऊनही लातूर जिल्ह्यातील महत्त्वाची विकासकामे रखडल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने आज लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सरकारविरोधात जोरदार जनआंदोलन करण्यात आले. “मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पायेगा” अशी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी रखडलेल्या विकासकामांकडे सरकारचे लक्ष वेधले.
लातूरच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्गाचे चौपदरीकरण व रस्ते विकास, लातूर रेल कोच फॅक्टरी व वंदे भारत स्लीपर कोच निर्मिती, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा लातूर टप्पा या कामांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
तसेच उदगीर-जळकोट MIDC, नाट्यगृह व भूमिगत गटार योजना, लातूर सुपर स्पेशालिटी रुग्णालय, लातूर विमानतळ विस्तारीकरण, वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग तसेच सोयाबीन प्रक्रिया व संशोधन केंद्र या प्रकल्पांचाही आंदोलनकर्त्यांनी उल्लेख केला.
लातूरच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती कामे अद्याप रखडली आहेत, याचा हिशोब सरकारने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर आणि मराठवाड्यातील विकासकामांना गती देऊन प्रलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली.
