विदर्भात जून व जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने पेरणी लांबली, नंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस अनियमित व खंडित झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह सर्व खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने तातडीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
आमदार सावरकर म्हणाले, जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. विहिरी, बोअरवेल आटल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी ३१ जुलै रोजी पीक विमा अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती, त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केवळ मुदतवाढ पुरेशी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार सावरकर यांनी समस्येवर उपाय योजनेखातर केलेल्या प्रमुख मागण्या अशा :
१. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
२. पीक विमा योजनेअंतर्गत तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
३. विम्याच्या कक्षेबाहेरील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
४. सोयाबीनसह सर्व पिकांना हेक्टरी विशेष मदत द्यावी.
५. पीक कर्ज वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे.
६. पुढील हंगामासाठी बियाणे, खते व निविष्ठांसाठी मदत द्यावी.
७. जनावरांसाठी चारा डेपो व पाण्याची व्यवस्था करावी.
८. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत व दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी.
विदर्भातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे.
सातत्याने शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले, अभियंता असलेले, स्वतः शेतकरी असलेले, ग्रामीण आणि शहरी भागाच्या समस्यांची जाण असणारे आमदार रणधीर सावरकर सातत्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांच्या भावना-संवेदना आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने करत असतात. आणि १४ कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी झटणारे देवा भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिका घेऊन आमदार सावरकरांच्या मागणीची दखल घेऊन त्याची पूर्तता करून आधार देण्याचे व न्याय देण्याचे काम करतील. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांविषयी ग्रामीण नागरिकांशी जोडलेली नाळ असणारे आमदार सावरकर यांच्या मागणीची पूर्तता मुख्यमंत्री करतील, असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेषतः पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांची व्यथा तसेच पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका तसेच वर्धा पासून सहा जिल्हे आत्महत्याग्रस्त शेतकरी ही असलेली प्रतिमा दूर करण्याचा सरकारचा असलेला प्रयत्नाला पुन्हा सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी रामचंद्र नावकार




