भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या स्पर्धेत यंदा विक्रमी १३७ स्पर्धकांचा सहभाग; आकर्षक घरगुती देखाव्यांनी वाढवली स्पर्धेची रंगत
प्रतिनिधी
शिरूर : गणेशोत्सवामध्ये घरगुती गौरी-गणपती सजावटीला प्रोत्साहन मिळावे आणि शिरूर शहर व परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी तब्बल १३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, हा स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतचा उच्चांकी सहभाग असल्याची माहिती आयोजक तथा भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी दिली.
शिरूर शहर व परिसरातील घरगुती गौरी-गणपती सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धकांनी विविध संकल्पना, आकर्षक सजावट आणि कल्पकतेचा वापर करून घरगुती देखावे साकारले आहेत.
स्पर्धेत गौरी सजावट, गणपती सजावट आणि ‘सेल्फी विथ बाप्पा’ अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक प्रकारात प्रत्येकी चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेचे विशेष आकर्षण असलेला ‘मानाचा उद्योजक प्रकाश धारिवाल गणराया करंडक’ देण्यात येणार आहे.
यंदा स्पर्धेला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि स्पर्धकांनी साकारलेले विविधांगी देखावे यामुळे स्पर्धेची रंगत वाढली आहे. विविध संकल्पना, आकर्षक सजावट आणि कल्पकतेने साकारलेल्या देखाव्यांमुळे विजेत्यांची निवड करताना परीक्षकांची कसोटी लागणार आहे.
लवकरच पारितोषिक वितरण समारंभ
स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. उद्योजक प्रकाशभाऊ धारिवाल, आदित्य धारिवाल तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याचे सुशांत कुटे यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून घरगुती गौरी-गणपती सजावटीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच नागरिकांच्या कलात्मकता आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यंदाच्या विक्रमी सहभागामुळे या उपक्रमाला शिरूरकरांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.







