चार शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरीला; गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार तालुक्यातील खोकराळे शिवारातील शेतांमधून विहिरीवरील विद्युत मोटारी व केबल वायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी चार शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारी व केबल लंपास केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदाम भगवान बोरसे यांच्या शेतातून सुमारे २४ हजार ५०० रुपये किमतीची विद्युत मोटार व केबल वायर चोरीला गेली. तसेच अंकुश नथ्थू पाटील यांच्या शेतातून सुमारे १९ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य लंपास करण्यात आले. भाऊसाहेब रघुनाथ धनगर व आनंदा तुकाराम धनगर यांच्या शेतातूनही विद्युत मोटार व केबल चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत अंकुश नथ्थू पाटील, सुदाम बोरसे, भाऊसाहेब धनगर व आनंदा धनगर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची कार्यवाही सुरू केली असून चोरीला गेलेल्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांना परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी, हवालदार रितेश इंदवे, मनोज विसपुते, मनोज चव्हाण, संजय मनोरे, तारासिंग वसावे, आकाश वळवी आदी सहभागी होते.
या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे.










