घरालगत कचरा व अस्वच्छतेचे साम्राज्य; तक्रार करूनही प्रश्न कायम
प्रतिनिधी / जळगाव : गावातील घरालगत मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचून अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज करून तब्बल आठ महिने उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.
अर्जदार कमलाबाई पुंडलिक सजोले यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली होती. घरासमोर तसेच घरालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचल्यामुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली असून, त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने स्वच्छता व साफसफाईची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अर्जातून करण्यात आली होती. मात्र, तक्रार अर्ज करून आठ महिने उलटूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घेऊन परिसराची स्वच्छता करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.










