दागिने व पैसे फसवणुकीने घेतल्याचा आरोप; धमकीप्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील आंबेरकोणी येथील अन्यायग्रस्त महिलेने दागिने व पैसे फसवणुकीने घेतल्याचा आरोप करत संबंधित पती-पत्नीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
संगीता धुमाळ, रा. आंबेरकोणी, यांचे पती निधन पावले असून त्या आपल्या बहिणीसोबत राहून उदरनिर्वाह करीत आहेत. त्याच परिस्थितीचा फायदा घेत गावातील माजी उपसरपंच रवींद्र राडये व रूतिका राडये या पती-पत्नीने गोड बोलून विविध कारणे सांगत आपल्याकडील पैसे व दागिने घेतल्याचा आरोप संगीता धुमाळ यांनी केला आहे. दागिने व पैसे परत मागितल्यानंतर संबंधितांकडून धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणाची सुरुवातीला गावपातळीवरील तंटामुक्ती समितीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर संगीता धुमाळ यांनी नाटे सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने त्यांनी १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
या उपोषणाची दखल नाटे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी घेतली. संबंधित महिलेला गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आल्यानंतर पोलिसांनी रवींद्र राडये व रूतिका राडये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा संगीता धुमाळ यांनी केला असून, पोलिसांनी सखोल तपास करून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. न्याय मिळाला नाही तर पुढील काळात टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





