वयोगट १७ व १९ मध्ये प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र
कुंभारवाडी, दि. २५ सप्टेंबर : प्रतिनिधी
SSB कॅम्प, कामठा फाटा येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुंभारवाडीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. वयोगट १७ मुली आणि वयोगट १९ मुली या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत कुंभारवाडीच्या संघांनी जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभारवाडी ही इयत्ता आठवीपर्यंतची शाळा असतानाही येथील तुलनेने कमी वयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या वयोगटातील खेळाडूंशी आत्मविश्वासाने सामना केला. उत्कृष्ट फलंदाजी, भेदक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि सांघिक खेळाच्या जोरावर दोन्ही गटांत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
दोन्ही गटांतील सामने अटीतटीचे आणि रोमहर्षक झाले. कुंभारवाडीच्या मुलींच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्तपणे दाद दिली. ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे खेळाडूंचा उत्साहही वाढला.
इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थिनींनी मोठ्या वयोगटात मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील मुलींमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेचे दर्शन घडवणारे ठरले आहे. योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील मुली क्रीडा क्षेत्रात मोठी मजल मारू शकतात, हे या कामगिरीतून अधोरेखित झाले.
या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.






