ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांची मुल येथे बदली; अवैध धंद्यांवर कारवाईचे नवे ठाणेदारांसमोर आव्हान
गोंडपिपरी प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा पोर्टल न्यूज
गोंडपिपरी : गोंडपिपरी पोलीस ठाण्यात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांची मुल येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारली.
रमेश हत्तीगोटे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देत विविध गुन्हे व प्रकरणांमध्ये पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना निरोप देण्यात आला.
नवनियुक्त ठाणेदार हेमंत पवार यांच्यासमोर गोंडपिपरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याचे आव्हान आहे. विशेषतः अवैध दारूविक्री, जुगार, सट्टा आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींची तत्पर दखल, गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा तसेच पोलीस आणि नागरिकांमधील समन्वय या बाबींवर नवे ठाणेदार कोणती भूमिका घेतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.






