पाणीटंचाईसह चारा संकटाचे सावट; शेतकऱ्यांना शासनाच्या प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा
येवला | प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर
येवला तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात मोठी वाढ झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली आहे. पुरेशा पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आणि बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमी झाल्याने हाता-तोंडाशी आलेली खरीप पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाईबरोबरच चारा टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे.
आंबेवाडी, बाळापूर, गुजरखेडे, ठाणगाव यासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत परिस्थिती चिंताजनक झाली आहे. पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी आणि कांदा पिकांवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके शेतातच होरपळून गेली आहेत. पिकांच्या लागवडीवर केलेला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पाणीटंचाईबरोबर चाऱ्याचाही प्रश्न गंभीर
पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्याचबरोबर हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालकांना महागड्या दराने वाळलेला चारा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पशुधन सांभाळण्याचे आव्हानही शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
ठाणगाव येथील स्थानिक शेतकरी अनिल भवर यांनी सांगितले की, पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाकडून निर्णय झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पोहोचणार, याकडे बळिराजाचे लक्ष लागले आहे. पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई, पाणीपुरवठा आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.







