पावसातील खंड व असमान वितरणामुळे शेतीचे नुकसान; मुख्यमंत्र्यांना निवेदन
ब्रह्मपुरी | ता. प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर
ब्रह्मपुरी तालुक्यात यावर्षी पावसाचे असमान वितरण तसेच पावसातील दीर्घ खंड यामुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
नुकतीच शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. तालुक्यातील सद्यस्थितीचा विचार करता हा निर्णय शेतकरी आणि नागरिकांसाठी चिंताजनक असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीने म्हटले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांना मदत व सवलती देण्याची मागणी
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून समावेश झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध मदत व सवलतींचा लाभ मिळण्यास मदत होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच आवश्यक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांना पीकविमा, कर्ज तसेच इतर शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून द्यावा. तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
निवेदन सादर करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगराध्यक्ष योगेश मिसार, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जिल्हा सदस्य प्रमोद चिमूरकर, प्रा. राजेश कांबळे, वासुदेव सौंदरकर, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, बंटीभाऊ श्रीवास्तव, नेताजी मेश्राम, वामन मिसार, नगरसेवक राकेश पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






