वीज, पक्का रस्ता, नाली व अंगणवाडीच्या मागण्या; महाग्रामसभेच्या गावभेटीत ग्रामस्थांनी मांडल्या समस्या
एटापल्ली | दि. ३ ऑक्टोबर २०२६
प्रतिनिधी :
एटापल्ली : पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागडच्या वतीने ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत नैताला गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी गावात गेल्या अनेक वर्षांपासून वीज, पक्का रस्ता, नाली आणि अंगणवाडी इमारतीचा अभाव असल्याचे समोर आले.
गावातील १७ कुटुंबे अद्याप वीजपुरवठ्यापासून वंचित असून, २०१८ मध्ये वीज जोडणीसाठी सर्वेक्षण करून विद्युत खांब उभारण्यात आले; मात्र अद्याप वीजपुरवठा सुरू झालेला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
गर्देवाडा ते नैताला हा सुमारे ७ किलोमीटरचा कच्चा रस्ता असून पावसाळ्यात वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गरोदर महिला, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नालीअभावी सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली.
“७० वर्षांपासून मतदान करतो; मात्र आजही वीज, रस्ता आणि नालीसारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत,” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
महाग्रामसभेने नैताला गावात तातडीने वीज, रस्ता व नाली सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नियमित वीजपुरवठा होईपर्यंत कलम २७५(१) अंतर्गत सोलर लाईटची व्यवस्था करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता महावितरण अहेरी आणि गटविकास अधिकारी एटापल्ली यांना पाठविण्याचा निर्णय महाग्रामसभेने घेतला.
यावेळी महाग्रामसभेचे उपाध्यक्ष बंडू दोरपेटी, कोषाध्यक्ष आशीष हिचामी, सदस्य लक्ष्मण जेट्टी, तसेच गावचे मुखिया, पाटला, पुजारी आणि सुमारे ४५ ग्रामस्थ उपस्थित होते.









