शहादा,दि.13 (का.प्र.)
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादाचे अध्यक्ष तथा परिसराचे लोकप्रिय नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक, कार्यकर्ते व मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना उदंड आयुष्याच्या व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात हा भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास विविध स्तरातून आलेले मान्यवर, कार्यकर्ते तसेच कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून दीपकभाई पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी दीपकभाई पाटील यांच्या अर्धांगिनी तथा मंडळाच्या सचिव सौ. जयश्रीताई दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यास आमदार राजेश पाडवी, शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधव जंगू पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, दूध संघाचे माजी चेअरमन उद्धव रामदास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील सखाराम पाटील, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सभापती व माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, राजाराम पाटील, मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष माधवीताई मकरंद पाटील, उद्योजक नूहभाई नुरानी, माजी उपनगराध्यक्ष युनूस बागवान, ॲडव्होकेट जसराज संचेती, ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.याशिवाय प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये तहसीलदार संभाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, गटविकास अधिकारी महेश पोद्दार, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, उद्योग व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्रत्यक्ष हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
विभागीय बुद्धिबळ स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद-
दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सुमारे 40 टेबल्सवर ही स्पर्धा पार पडली. यामध्ये वर्षे वयोगटातील बालकांपासून ते 65वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत अशा विविध गटांतून तब्बल 152 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.
या संपूर्ण अभिष्टचिंतन व बुद्धिबळ स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी मानले. कार्यक्रम व बुद्धिबळ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य, क्रीडा संचालक प्रा. डॉ. अरविंद कांबळे, प्रा. गोपाल गवई, प्रा. महेश जगताप, बुद्धिबळ मास्टर शोबराज खोंडे आणि प्रा.काशिनाथ नागेश यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नंदुरबार येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे 13 वे राज्य अधिवेशन उत्साहात संपन्न; मूलभूत सुविधांचा अभाव हे शासक जातींचे षडयंत्र – वामन मेश्राम.
शहादा,दि.13(का.प्र.)
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार शहरात 13 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरसिंग राणा यांनी भूषवले, तर उद्घाटन ‘माडा’ संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनाला मुख्य मार्गदर्शक म्हणून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयदीप कांबळे, प्रतीक्षा चव्हाण, ॲड. रणजीत पाडवी, ॲड. सुजाता चौदांते, संजय पावरा, जमन ठाकरे, डॉ. शरद चव्हाण, ॲड. सुभाष वळवी, पतंगराव खोकले, नूर सलीम सिकलीगर, अजय वळवी, लालसिंग तडवी, सुनील महिरे, संजू रगडे व नंदू बैसाणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
अधिवेशनातील प्रबोधन सत्र दोन टप्प्यांत पार पडले, ज्यामध्ये आदिवासी समाजाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. मुख्य मार्गदर्शक वामन मेश्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासींचे हजारो प्रश्न प्रलंबित आहेत. आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, कुपोषण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत सुविधांचा आजही मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येतो. हे शासक जातींचे एक षडयंत्र असून ते ओळखणे ही काळाची गरज आहे.” पुढे बोलताना त्यांनी डी-लिस्टिंगच्या माध्यमातून आदिवासींमध्ये फूट पाडणे, संविधानातील पाचवी आणि सहावी अनुसूची लागू न करणे, तसेच जल, जंगल व जमिनीचा खरा मालक असलेल्या आदिवासींनाच जंगलातून हाकलून लावण्याच्या प्रयत्नांवर तीव्र शब्दांत आरोप केले.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात 70 ते 80 च्या दशकात शासनाने आदिवासींना दिलेल्या जमिनी परत घेण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप करत, त्यासंबंधीचे शासकीय परिपत्रक वामन मेश्राम यांनी मंचावर फाडून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.राष्ट्रीय अध्यक्ष वीरसिंग राणा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “आदिवासी हजारो वर्षांपासून जंगलात राहत आहेत, मात्र विस्थापनाच्या नावाखाली त्यांना बेघर करण्याचे षडयंत्र शासन रचत आहे. डोंगराळ भागातील मौल्यवान खनिजे व धातू काढण्यासाठी शासन विविध योजना आखत आहे.” यामुळे संपूर्ण भारतातील आदिवासींनी एकत्र येऊन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जनआंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात इतर अनेक प्रमुख पाहुण्यांनी आदिवासींच्या समस्यांवर प्रकाश टाकत तीव्र संताप व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय निकुंभे यांनी केले, तर आभार कैलास डोखले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी, संतोष शिरसाठ, ईश्वर वसावे, कनवर वळवी, लालसिंग पाडवी, किसन वसावे, बिरबल वळवी, अकबर वळवी, लालसिंग वसावे, गणेश वसावे, चंद्रसिंग वसावे, वीरसिंग वसावे व सेगा वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मराठी विश्वकोश परिचय परीक्षेत सोनामाई महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश.
शहादा,दि.13(का.प्र.)
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त आयोजित ‘मराठी विश्वकोश परिचय परीक्षा’ मध्ये सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालय, शहादा येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत नंदुरबार जिल्हास्तरावर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. सिमरन नबाबखाँ पठाण हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच महाविद्यालयीन स्तरावर तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी रोजमीन बानो अख्तर शाह हिने प्रथम, द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी भावना प्रभाकर बोरसे हिने द्वितीय, तर तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी सुमय्या मुख्तार खोकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना महाविद्यालयातील मराठी विश्वकोश परिचय परीक्षेचे मार्गदर्शक व समन्वयक प्रा. डॉ. अनिल साळुंके यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले. मराठी भाषेतील ज्ञानसंपदा, संदर्भसाहित्य आणि विश्वकोशीय माहिती यांविषयी विद्यार्थिनींमध्ये आवड आणि जिज्ञासा निर्माण करण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
जिजामाता कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार येथे आयोजित भव्य बक्षीस वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक बाहुरू सोनवणे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय बोराणे, सहाय्यक संतोष गेडाम, डॉ. स्नेहा खोब्रागडे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मनोज गायकवाड, सहाय्यक सचिव ललित कुडमुथे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले.विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा भारतज्योती आशाताई जाधव, उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, सचिव वर्षा जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुधीर जाधव, सचिव प्रा. संजय जाधव, प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव, समन्वयक संजय राजपूत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, परीक्षा मार्गदर्शक व समन्वयक प्रा. डॉ. अनिल साळुंके, सहसमन्वयक प्रा. डॉ. भारत चाळसे, प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे, प्रा. डॉ. अनिल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शहादा तालुका शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण.
शहादा,दि.13(का.प्र.)
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहादा तालुक्यात शिवसेना पक्षाच्या विविध पदांवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख ॲड. रामभैय्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्तीपत्रे देण्यात आली असून, शिवसेना नेते तथा आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार येथील आमदार कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
शहादा तालुका शिवसेना प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केलेल्या शिफारशींनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख ॲड. रामभैय्या रघुवंशी, युवा सेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, नगरसेवक कुणाल वसावे, शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, जयसिंग ठाकरे, मुरलीधर वळवी, हितेंद्र वर्मा, गोपाल कोळी, पृथ्वीराज राजपूत, धनराज जायसवाल, दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, “शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पक्षाच्या धोरणानुसार पार पाडावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक गावात आणि पाड्यात शिवसेनेचा विस्तार करून पक्षाच्या शाखा स्थापन कराव्यात. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करावा,” असे आवाहन त्यांनी केले. नियुक्तीपत्रे प्राप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहादा तालुका प्रमुख अजय दाजू भिल, तालुका संघटक हेमंत मन्साराम सूर्यवंशी, महिला तालुका प्रमुख संगीता सचिन पवार, युवती सेना तालुका प्रमुख प्रियंका गोविंद ठाकरे, सहसंघटक एकनाथ रतिलाल ठाकरे यांचा समावेश आहे.तालुका उपसंघटक: संतोष सरदारसिंग गिरासे, गणेश कालूसिंग तडवी, मणिलाल बालम सोनवणे, दिनेश भोमराज पवार, आनंदा गोविंद ठाकरे आणि अशोक हुऱ्या वसावे.तालुका उपप्रमुख: संतोष फकीरा चौधरी, छगन गुंजाऱ्या तडवी, जगदीश रूपसिंग चव्हाण, विलास वासुदेव चौधरी, विकास राजेंद्र पाटील, कैलाश टुका पवार, सुजित रमेश शेमले व जगदीश धनराज पाटील.तालुका समन्वयक: लक्ष्मण भटू पवार, विनोद मोहन पाटील, संतोष गुलाब चित्ते, प्रकाश गुलाब चित्ते (शिंपी), तुकाराम प्रल्हाद भोई आणि अमृत लालसिंग भिल.तालुका उपसमन्वयक: श्रवण बाबुराव भिल, संजय अंबरसिंग सूर्यवंशी आणि प्रदीप हिरालाल पाडवी.
शहादा विधानसभा प्रमुख: भीमसिंग भाटया तीरसे.शहादा विधानसभा समन्वयक: भारसिंग जामसिंग वसावे.नंदुरबार विधानसभा संघटक (शहादा तालुका क्षेत्र): कांतीलाल उत्तम धनगर आणि अनिल धुडकू साठे.नंदुरबार विधानसभा प्रमुख (शहादा तालुका क्षेत्र): रितेश खेमराज बोरसे आणि संतोष खंडू पाटील.नंदुरबार विधानसभा समन्वयक (शहादा तालुका क्षेत्र): अमृत चिमण ठाकरे, श्रीगणेश बन्सीलाल सोलंकी आणि नरेश भास्कर पाटील.गटप्रमुख: पाडळदा गटप्रमुख राकेश ब्रिजलाल पवार, प्रकाशा गटप्रमुख प्रेमल संजय राठोड (राहुल लोहार) आणि चांदसैली (फॉरेस्ट) गटप्रमुख कृष्णा हारसिंग सोनवणे.यावेळी शहादा तालुका शिवसेना प्रमुख मनलेश जायसवाल यांनी आगामी काळात शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.पक्ष प्रवेशानंतर उर्वरित पदांसाठी वरिष्ठांकडे शिफारशी करण्यात येतील आणि त्यानंतर पुढील नियुक्त्या करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.नियुक्तीपत्र वितरणानंतर शहादा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी व शिवसैनिकांनी शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकस्थळी भेट देऊन अभिवादन केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमामुळे शहादा तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केली.
नागरी समस्यांवर वकिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.
शहादा,दि.13(का.प्र.)
शहादा शहरातील विविध नागरी समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत विकास निधीच्या वाटपात शहरावर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी शहादा शहरातील वकील बांधवांनी मुख्याधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांची तातडीने उकल करून विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहादा हे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी व प्रशासकीय केंद्र असतानाही शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, अतिक्रमण आणि आरोग्यविषयक अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारी येऊनही त्यांचे कायमस्वरूपी निराकरण होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित मोतीलाल पाटील हे शहराच्या विकासासाठी आणि समस्या मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र, जिल्हा नियोजन समितीकडून इतर ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असताना शहादा नगरपालिकेने सादर केलेल्या विकास प्रस्तावांना अपेक्षित मंजुरी आणि निधी मिळत नसल्याने शहराचा विकास खुंटला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निधीअभावी विकासकामे रखडल्यास नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून पालिका अधिकारी व संबंधित यंत्रणांची बैठक घ्यावी आणि ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात समानता राखून शहादा शहराला न्याय द्यावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. एम. निकम, ॲड. ई. जी. पाठक, ॲड. पी. एन. गुरव, ॲड. सरजू चव्हाण, ॲड. मुर्तजा ए. सय्यद, ॲड. बी. जे. जयस्वाल, ॲड. के. डी. सोनार, ॲड. सी. एम. संचेती, ॲड. एस. एस. कुवर, ॲड. संगीता पाटील, ॲड. रिचा महाजन, ॲड. एफ. के. पाडवी, ॲड. भोजेंद्र शिंदे, ॲड. रमिझ इसानी, ॲड. राजकन्या पाटील व ॲड. श्रीराम राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




