संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आणि पशुपालकांमध्ये चारा नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी, पशुवैद्यकीय चिकित्सालय, कजगाव यांच्या वतीने बोदर्डे (ता. भडगाव) येथे आयोजित करण्यात आलेले ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमाला गावातील शेतकरी आणि पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अभियानांतर्गत बोदर्डे गावातील श्रीराम मंदिरात शेतकऱ्यांसाठी एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कजगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश मंत्री यांनी उपस्थित पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केवळ आगामी चारा टंचाईवर कशी मात करावी यावरच नव्हे, तर शेतकऱ्यांना दूध उत्पादनात भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या आणि त्यावरील प्रभावी उपाय यावरही अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, वाळलेल्या आणि निकृष्ट चाऱ्याला सकस बनवण्यासाठी ‘युरिया प्रक्रिया’ किती फायदेशीर आहे, याचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
गोठ्यावर जाऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक:
केवळ तात्विक माहितीपुरते मर्यादित न राहता, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. श्रीराम मंदिरातील मार्गदर्शनानंतर, डॉ. ऋषिकेश मंत्री आणि त्यांच्या टीमने थेट एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर जाऊन वाळलेल्या कुटार/कडब्यावर ‘युरिया प्रक्रिया’ कशी करावी, याचे जिवंत प्रात्यक्षिक (Live Demo) सर्व शेतकऱ्यांना करून दाखवले. १०० किलो कोरडा चारा, ४ किलो युरिया आणि ५० लिटर पाण्याचे द्रावण वापरून चारा हवाबंद कसा करावा आणि २१ दिवसांच्या साठवणुकीनंतर तो जनावरांना कसा द्यावा, हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले.
मानले आभार:
या स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोदर्डे सहकारी दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन आणि सचिव यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच याकामी श्री. वाल्मीक पाटील यांचेसह. परिसरातील सर्व डॉक्टर विशेष सहकार्य लाभले.
ऐन टंचाईच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवावा आणि दूध उत्पादनातील अडचणी कशा दूर कराव्यात, याचे अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन मिळाल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.







