अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट; दुष्काळ निवारणासाठी स्वतंत्र नियोजनाची मागणी
नाशिक / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध भागांत दुष्काळाचे सावट गडद होत असताना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे. “माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया,” असे आवाहन समितीचे जनरल सेक्रेटरी तथा नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी केले.
अमोलभाऊ भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन दुष्काळग्रस्त भागांतील नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या नियोजनासंदर्भातील मुद्दे मांडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष शर्मा कार्यालयात उपस्थित नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान समितीचे पदाधिकारी अमोलभाऊ भागवत, नाशिक जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ मंडलिक, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्रजी मगर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्यांतील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि दुष्काळी परिस्थितीतील अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या घोषणा आणि जिल्हा प्रशासनाकडून होणारी अंमलबजावणी यामध्ये समन्वय व प्रभावी नियोजनाची आवश्यकता असल्याचे समितीने नमूद केले.
दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणीटंचाई, अन्नधान्याचा तुटवडा, जनावरांसाठी चारा आणि वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी प्रशासनाने कोणते विशेष नियोजन केले आहे, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच समितीच्या वतीने दुष्काळ निवारणासाठी स्वतंत्र नियोजनाचा प्रस्तावही सादर करण्यात आला.
चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, जनसेविका दीपलीताई वाणी, मनिषाताई भुजबळ आणि अंजलीताई जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत समितीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणीही करण्यात आली. या बैठकीत दुष्काळग्रस्त भागांतील गंभीर समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा सविस्तर आढावा सादर करण्याची तयारी समितीने दर्शविली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्वसामान्य जनतेविषयीच्या भूमिकेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी कौतुक केल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. चर्चेनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून भेटीची माहिती दिली.
यावेळी महिला प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, जनसेविका आशाताई भोईर, उपाध्यक्ष ज्योतीताई परदेशी, दिव्यांग अध्यक्ष सुरदास पावसे, जिल्हा सचिव सुनीताताई गांगुर्डे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, श्यामआप्पा डावरे, मनीषाताई पंचाक्षरी, जगनभाऊ पवार, संजय नाना बलकवडे, बिस्मिल्ला खान, राजूभाऊ मांडे, राजाभाऊ सिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.











