करंजगाव परिसरात अजगर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; कोणतीही इजा न पोहोचवता नैसर्गिक अधिवासात सोडले
भोर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील करंजगाव परिसरात तब्बल १० ते १२ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच चर्चा सुरू झाली. अजगर दिसताच नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या आकाराच्या या अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत काळजीपूर्वक पकडण्यात आले. त्यानंतर त्याचे सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
अजगराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, सर्पमित्रांनी प्रसंगावधान राखत संपूर्ण रेस्क्यू मोहीम शांततेत पार पाडली. अजगराला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वन्यजीव हे निसर्गसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अजगर किंवा अन्य वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून त्यांना पकडण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तातडीने सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.











