सुरक्षित बचपन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना कायदेविषयक हक्क, कर्तव्ये आणि बालसुरक्षेबाबत मार्गदर्शन
शेवाळी, ता. साक्री (प्रतिनिधी) : धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, साक्री तालुका विधी सेवा समिती आणि शिवाजी माध्यमिक विद्यालय, शेवाळी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित बचपन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विधी सेवा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. साक्री तालुक्याच्या न्यायाधीश श्रीमती मुग्धा गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख व्याख्याते ॲड. ए. बी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक हक्क, कर्तव्ये, बालसुरक्षा तसेच कायद्याविषयी जागरूकतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला साक्री तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. सुनील नांद्रे, ॲड. संग्राम भोसले, अनिल वळवी, सुरक्षित बचपन अभियानाचे प्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थिनींनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर जनजागृतीपर गीत सादर केले. या गीतासाठी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती प्रणाली खैरनार यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या या सादरीकरणातून मोबाईलच्या वापराबाबत जागरूकतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रिजवान सय्यद यांनी केले, तर श्री. गिरीश रामोळे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तारकेश्वरी निकम यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.










