२७ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होणार सन्मान; पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल
मुंबई, कांदिवली पश्चिम : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. माऊली कला व कल्याणकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य आणि काशिनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दि. २७ डिसेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे निवडपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ आव्हाड, उपाध्यक्षा नंदा बागूल आणि सचिव सागर साठे यांनी भारत कवितके यांना निवडीचे पत्र देऊन पुरस्काराबाबत माहिती दिली.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारत कवितके म्हणाले, “पुरस्कार प्रेरणा आणि ऊर्जा देतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आणखी जोमाने लिहिण्याचे बळ मला मिळो. पुरस्कार आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतात. पुरस्कारांची संख्या मोजण्यापेक्षा सामाजिक कार्यातील आपली उंची किती आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ही जाणीव ठेवूनच मी पत्रकारिता करतो.”
पत्रकारितेतील सुरुवातीच्या संघर्षाच्या आठवणी सांगताना त्यांनी एका वृत्तपत्रातील अनुभवही कथन केला. सुरुवातीला त्यांच्या बातम्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी जिद्द आणि चिकाटी न सोडता लेखन सुरू ठेवले. कालांतराने त्याच वृत्तपत्रातून त्यांच्या बातम्या नियमित प्रसिद्ध होऊ लागल्या. आज बातम्या पाठविण्यात खंड पडल्यास संपादकीय विभागाकडून विचारणा केली जाते, ही बाब सांगताना त्यांनी समाधान व्यक्त केले. “मी लिहीत गेलो, लिहीत आहे आणि लिहीत राहणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
भारत कवितके यांचे लेख, बातम्या, कविता, कथा आणि चारोळ्या महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्यांची आतापर्यंत अकरा पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांनी लिहिलेली ३४ गाणी यूट्यूबवर प्रसारित झाली आहेत. विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांमधूनही त्यांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचत असते.
पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे संपादक, वाचक तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. नवोदित पत्रकार आणि साहित्यिकांना लेखनासाठी प्रेरणा देणारे उदाहरण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.
‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्यानंतर भारत कवितके यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.











