सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर; संघटनेच्या मागणीला यश
प्रतिनिधी, रिटकवली, सातारा
सातारा : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि कुटुंबीयांसोबत सुखाचे क्षण घालवण्याचा सण! यंदा सातारा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी अधिक आनंदाची ठरणार आहे. स्वराज कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना यंदा २२ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी स्वराज कामगार संघटनेने केली होती. संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानंतर स्वराज कामगार संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप पाठसुते, सचिव कपिल मट्ट, संजय वायदंडे, खजिनदार रवींद्र धडचिरे, आकाश कांबळे, सूरज माने, किरण गाडे, निखिल कांबळे, अमोल वायदंडे, सागर खरात, सतीश सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दिवाळीच्या फराळाचा गोडवा आणि त्यात २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान यामुळे सातारा नगरपालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. स्वराज कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले हे यश कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरले आहे.










