आश्रमशाळांमधील १ हजार ३५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी
पेण, रायगड (प्रतिनिधी), दि. १ नोव्हेंबर २०२६ : आदिवासी विकास विभाग, प्रकल्प पेण यांच्या वतीने आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ शासकीय आश्रमशाळा, पिंगळस येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला. प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
पेण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमधील एकूण १ हजार ३५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे क्रीडांगणावर चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्या वर्षा दोरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष माने, महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर कारोटे, पंचायत समिती सदस्य अक्षय तितकारे, राष्ट्रीय खेळाडू स्पूर्ती माने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुप्रिया पाटील, संतोष गायकवाड, सोळसकर, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर फसाळे, विस्तार अधिकारी शशिकांत साबळे, सौरभ बोबडे, कार्यालय अधीक्षक सोनावणे आणि शाळेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखविण्यासोबतच स्पर्धात्मक अनुभव मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.










