सोनखेड तलावात प्रदेशाध्यक्ष मयूर बोर्डे यांचे आंदोलन; दररोज किमान दोन तास पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी | जाफ्राबाद, जालना
जाफ्राबाद : तालुक्यातील शेतकरी आणि पशुधन भीषण पाणीटंचाईने त्रस्त झाले असून, धरणात पाणी उपलब्ध असतानाही शेतकरी व जनावरांच्या पिण्यासाठी पाणी सोडले जात नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मौजे सोनखेड येथील तलावात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मयूर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले.
शेतकरी आणि त्यांच्या जनावरांना पिण्यासाठी दररोज किमान दोन तास पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. पाण्याअभावी जनावरांचे हाल होत असून, काही जनावरे दगावत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोन्मैल भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे प्रदेशाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी सांगितले. धरणात पाणी असताना स्थानिक शेतकरी आणि पशुधनाला पिण्यासाठी पाणी मिळत नसेल, तर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.
जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही आणि पाणी सोडण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात जाफ्राबाद तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले असून, पाणीप्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







