मागील वर्षी पाच शिक्षकांची निवड; यंदा संख्येत लक्षणीय वाढ – यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुका अव्वल
उमरखेड (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रमांतर्गत सन २०२६-२७ च्या जिल्हास्तरीय निवड यादीत उमरखेड तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश झाला आहे. या यशामुळे यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी तालुक्यातील केवळ पाच शिक्षकांची निवड झाली होती. यंदा ही संख्या वाढून २८ वर पोहोचली आहे. ही लक्षणीय वाढ उमरखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा अनुभव राज्यातील इतर शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. तसेच शिक्षकांच्या कार्याची नोंद असलेली ‘शिक्षक व शाळा बँक’ तयार करण्याचाही या उपक्रमामागील हेतू आहे.
या निवड प्रक्रियेत एकूण १०० गुणांचे मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये अध्यापन कार्य आणि वर्गातील गुणवत्तेसाठी ६० गुण, तर व्यक्तिमत्त्व, प्रशासनास सहकार्य आणि प्रशिक्षणातील सहभाग यांसारख्या बाबींसाठी ४० गुण निर्धारित करण्यात आले आहेत. शिक्षकांनी अध्यापन कार्यात घेतलेली मेहनत, विविध शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग आणि निवड प्रक्रियेचे योग्य नियोजन यामुळे यंदा उमरखेड तालुक्यातील शिक्षकांच्या निवडीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
निवड झालेल्या २८ शिक्षकांची नावे व शाळा
१. विजय कोकरे – बिटूरगाव
२. कांचन चंद्रवंशी – चातारी
३. कैलास कोंडरवाड – बोरी
४. शशांक पाचकोरे – चिंचोली (वण)
५. परमेश्वर घुसे – भवानी
६. गजानन कुंभारवार – खरूस
७. भावना निमजे – ढाणकी
८. अविनाश नरवाडे – एकांबा
९. लक्ष्मण किसान बंडेवार – मोरचंडी
१०. सुदीप राहूलवाड – दराटी
११. प्रदीप जगदंबवार – सेवाळाल नगर
१२. कमलाकिशोर कदम – कुळपी
१३. दिलीप जाधव – मरसूळ
१४. विष्णू दुधे – बिटूरगाव खुर्द
१५. प्रमोद पवार – माळेगाव
१६. आर. डी. शिंदे – महात्मा फुले शाळा, उमरखेड
१७. रविंद्र चव्हाण – पिंपळगाव
१८. अमोल माने – अमदापूर
१९. नितीन बोलकुंतवार – दिघडी
२०. सुधाकर ककडे – चालगणी
२१. अ. तय्यब (लाला शेख) – सुकळी (ज.)
२२. कैलास गारोळे – नागेशवाडी
२३. डॉ. विनय चव्हाण – तरोडा
२४. खुर्शीद खान पठाण – वसंतनगर
२५. अब्दुल्ला रहमान मेहबूब खान पठाण – पार्डी चुरमुरा
२६. शरद थोरकर – विडूळ
२७. गजानन देवकते – धनज
२८. ज्ञानेश्वर पामपटवार – झाडगाव
शिक्षकांच्या कार्याचा गौरव
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आणि शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देणे अशा कार्याची या उपक्रमातून दखल घेतली जात आहे.
उमरखेड तालुक्यातील २८ शिक्षकांची झालेली निवड ही तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक ठरली आहे. या यशामुळे शिक्षकवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.








