श्रीगोंदा, :- (तालुका प्रतिनिधी )६ अक्टोबर :-
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंद्यात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. नेत्यांची उमेदवारीसाठी धावाधाव सुरू आहे. अशातच उमेदवारीबाबत दावे-प्रतिदावे करताना कार्यकर्ते उथळ भूमिका घेत आहेत. आधीच उमेदवारीच्या प्रश्नाने ग्रासलेल्या नेतेमंडळींना कार्यकर्त्यांच्या उथळ वागण्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या महायुतीतर्फे विद्यमान आमदार श्री.बबनराव पाचपुते किंवा त्यांचे कुटुंबीय आणि महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार श्री.राहुल जगताप यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. या दोन्ही नेत्यांचा अपवाद वगळता जवळपास अन्य सर्वच नेतेमंडळी उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वोतोपरी ‘लॉबिंग’ करताना दिसत आहेत.
त्यामुळे या इच्छुकांची उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या गाठी-भेटी घेणे, शिष्टमंडळ पाठविणे आदी बाबींची पळापळ सुरू आहे. एकीकडे नेतेमंडळी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात गुंतलेले असताना दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र परिस्थितीचे भान न राखता उमेदवारीबाबत उथळपणे दावे-प्रतिदवे केले जात आहेत. काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळणार म्हणत मोठ्या पैजा लावल्या आहेत. कोणी आपल्या नेत्याला उमेदवारी निश्चित झाली म्हणत फटाके फोडले आहेत. काही गावांमध्ये तर कार्यकर्त्यांनी नेत्याची उमेदवारी निश्चित झाल्याच्या आनंदात थेट पेढेच वाटले आहेत. उमेदवारीबाबत दावे करताना मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा अतिरेकी बॅनरबाजी करण्यात आली आहे, ती वेगळीच!
सोशल मीडिया तर कार्यकर्त्यांचे हक्काचे व्यासपीठ असल्याने तिथे उथळपणाला अधिक धार आली आहे. उमेदवारीच्या अनिश्चिततेमुळे काही नेत्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आधीच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘नियोजित’ पक्षाचे निवडणूक चिन्ह टाकून अधिक गोंधळ उडवून दिला आहे. स्वतःच्या नेत्याच्या समर्थनार्थ व विरोधी नेत्यावर हल्ला करताना कार्यकर्ते मर्यादा ओलांडत असल्याने तीही नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
उमेदवारीसाठी ‘लॉबिंग’ करणाऱ्या विधानसभेच्या इच्छुक नेतेमंडळींसमोर कार्यकर्त्यांच्या उथळपणाला आवर घालण्याचे आणखी एक काम वाढले आहे. काही नेत्यांनी उथळ कार्यकर्त्यांना संयमी राहण्याच्या सूचना केल्याही आहेत. परंतु, काही मंडळी ऐकायलाच तयार नसल्याने कार्यकर्त्यांचे प्रताप नेत्यांना मनस्ताप ठरत आहेत. कार्यकर्त्यांच्या उथळपणामुळे राजकीय वातावरण मात्र अधिकच तापले आहे, एवढे मात्र नक्कीचं.
Discussion about this post