आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या सविता तळेकर यांचा पुढाकार; सोमवारी २१ गावांतील रखडलेल्या पाणी योजनांची अधिकारी करणार पाहणी
वाशी | प्रतिनिधी
पारगाव जिल्हा परिषद गटातील २१ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर महिनाभरासाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या सविता विकास तळेकर यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारातून प्रशासन आणि आंदोलक यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पारगाव येथे जलजीवन मिशनअंतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे १,६०० मीटर पाइपलाइनचे काम रखडले आहे. यासह पारगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधील अपूर्ण आणि बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर बनला होता. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी बीड-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सांगळे, गटविकास अधिकारी जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी मिरजकर, विस्तार अधिकारी माचवे, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश मेत्रे व गटविकास अधिकारी जाधव यांच्या मध्यस्थीने आंदोलक आणि प्रशासन यांच्यात चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान पारगाव येथील रखडलेल्या १,६०० मीटर पाइपलाइनचे काम तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला लेखी आदेश देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. संबंधित एजन्सीने सोमवारपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पारगाव जिल्हा परिषद गटातील बंद पडलेल्या आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारपासून विशेष पाहणी करण्यात येणार आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता कुमटे यांच्यासह संबंधित अधिकारी विविध गावांना भेट देऊन योजनांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
या पाहणीत पारगाव, पिंपळगाव कमळेश्वर, तांदूळवाडी, घाटपिंपरी, लोणखस, जानकापूर, विजोरा यांसह गटातील इतर गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. तांदूळवाडीसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करणे, तोपर्यंत नियमित टँकर सुरू ठेवणे, अपूर्ण योजनांची कामे पूर्ण करणे, कामात दिरंगाई करणारे अधिकारी व कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करणे आणि सर्व योजनांचे तांत्रिक परीक्षण करणे, या मागण्याही आंदोलकांनी कायम ठेवल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या लेखी आदेशांचा आणि आश्वासनांचा सकारात्मक विचार करून रास्ता रोको आंदोलन एक महिन्यासाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, आंदोलन स्थगित झाले असले तरी २१ गावांच्या पाणीप्रश्नाबाबतच्या सर्व मागण्या कायम असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सविता विकास तळेकर यांनी स्पष्ट केले. महिनाभरात कामांमध्ये ठोस प्रगती झाली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पारगाव जिल्हा परिषद गटातील २१ गावांतील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष कामे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. केवळ कागदोपत्री आदेश नकोत, तर नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका सविता तळेकर यांनी मांडली.
या आंदोलनात युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, पोपट सुरवसे, समाधान मोटे, अशोक लाखे, विलास खवले, बाबासाहेब हारे, कुंडलिक आखाडे, अमित कोळी, तानाजी कोकाटे, भागवत चौधरी, संभाजी मुळे, तुकाराम वीर, राजेभाऊ जोगदंड, प्रकाश पाटील, रंजीत भैरट, राहुल आडमुटे, श्रीकांत पाटील, महेश कोकणे, कृष्ण पवार, चेतन कोकणे, महेश आटोळे, अशोक जाधव, शरद मोटे, अंजली समाधान मोटे, आशाताई गावडे, मायाताई आहिरे, प्रताप चव्हाण, तुकाराम अहिरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.








