विहिरीच्या खोदकामादरम्यान काळाचा घाला; दोघांचे मृतदेह सापडले, अन्य दोघांचा शोध सुरू
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीच्या खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. खोदकाम अंतिम टप्प्यात आले होते. नेहमीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी सकाळी मजूर कामासाठी विहिरीवर गेले होते. दरम्यान, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विहिरीचा मातीचा ढिगारा अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार मजूर मातीखाली गाडले गेले.
या दुर्घटनेत मंगेश गोविंद मोरे (वय ४५, रांझणी), सिद्धेश्वर घाडगे (वय ४५, रांझणी), तानाजी घोडके (वय ५१, अनवली) आणि आबा भिवा घोडके (अनवली) यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
या दुर्दैवी घटनेमुळे आंबे गावासह रांझणी आणि अनवली परिसरात शोककळा पसरली आहे.










