बाधित कुटुंबांची घरोघरी जाऊन विचारपूस; आर्थिक मदतीसह अन्नधान्य व कपड्यांचे वाटप
नांदगाव : नांदगाव तालुक्यातील सटाणे कऱ्ही गावात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच ठिकाणी धाडसी दरोडे टाकल्याची घटना घडली. या घटनेत दरोडेखोरांनी वयोवृद्धांसह प्रतिकार करणाऱ्या नागरिकांवर लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संकटाच्या काळात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सटाणे कऱ्ही गावाला भेट देऊन दरोडाग्रस्त कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी प्रत्येक बाधित कुटुंबाच्या घरी जाऊन विचारपूस केली तसेच कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी त्यांनी प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदतीसह अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप केले.
‘तुम्ही निश्चिंत राहा. यापुढे आणखी काही मदत लागली, तर तुमच्यासाठी मी सदैव हजर आहे. तुम्ही फक्त फोन करा. तुमचा मुलगा आणि भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,’ अशा शब्दांत आमदार कांदे यांनी बाधित कुटुंबीयांना आधार दिला.
यावेळी युवा सेना जिल्हाधिकारी फरहान दादा खान यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटग्रस्त कुटुंबांना या भेटीमुळे मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.










