दृक्-श्राव्य उपक्रमातून विद्यार्थ्यांना सूर्यमाला, ग्रह आणि ताऱ्यांची ओळख; खगोलशास्त्राविषयी कुतूहल वाढले
चिचोंडी पाटील, दि. १६ नोव्हेंबर : आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशन (AESA), अहिल्यानगर आणि पोलाद स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचोंडी पाटील येथे ‘आकाशगंगेची सफर’ हा नाविन्यपूर्ण दृक्-श्राव्य शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला. ‘क्षितिजाच्या पलीकडचा प्रवास! अंतराळ, ग्रह आणि ताऱ्यांची अद्भुत दुनिया आता अगदी जवळून पहा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने विद्यार्थी आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. AESA आणि पोलाद स्टील कंपनीच्या वतीने आलेल्या चमूने नियोजनबद्ध पद्धतीने या उपक्रमाचे सादरीकरण केले. चलचित्र आणि दृक्-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना सूर्यमाला, विविध ग्रह, तारे तसेच अंतराळातील अनेक रहस्यांची सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली. या अनोख्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांच्या अवकाशविषयक आणि खगोलशास्त्राच्या ज्ञानात भर पडली. अंतराळातील दृश्ये पाहताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता आणि आनंद दिसून आला.
या शैक्षणिक उपक्रमासाठी गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गावातील उद्योजक बरबडे साहेब, त्यांचे सहकारी महामुनी, ग्रामपंचायत सदस्य तथा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोकबापू कोकाटे यांची उपस्थिती होती.
तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश इंगळे, अमर शेख सर, राजू कोकाटे, जितू गाडे, छाया जपकर, शाळेचे उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पोलाद स्टील कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुंदर नियोजनाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन व जिज्ञासा निर्माण करण्यासाठी असे दृक्-श्राव्य शैक्षणिक उपक्रम उपयुक्त ठरतात, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.











