राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचाही गौरव
रायगड | प्रतिनिधी
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे MEDION व ANAND HOSPITAL यांच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कैलासराजे घरत यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कैलासराजे घरत हे ‘लातूर नगरी वार्ता’चे मुंबई विभाग संपादक असून, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्यासोबतच समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कैलासराजे घरत हे अनेक सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय असून, त्यांना यापूर्वीही विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते विविध शैक्षणिक उपक्रम राबवतात. यामध्ये शैक्षणिक जनजागृती, शैक्षणिक साहित्य वाटप, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, एसएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव अशा उपक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, वनराई बंधारे, व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, आरोग्य शिबिरे, सर्प जनजागृती आणि पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.
समाजातील अन्यायकारक घटना आणि सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कैलासराजे घरत सातत्याने प्रयत्न करतात. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेची आणि समाजहिताच्या कार्याची दखल घेत पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि युवा फ्रेंड्स सर्कल फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला अधिक बळ मिळावे आणि समाजसेवेचा हा प्रवास असाच अविरत सुरू राहावा, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
समाजसेवेच्या क्षितिजावर चंदनापरी झिजणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या कैलासराजे घरत यांचे कार्य हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस ‘सारथी न्यूज’ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!











