______________
प्रसिध्दीसाठी प्रासंगीक लेख
______________
सादिक पापामियाँ खाटीक आटपाडी जि . सांगली .
प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग .
राष्ट्रीय उपाध्यक्ष, कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारत .
______________
माँ, माऊली, आई, माता या दैवी अविष्काराची अनुभूती देणाऱ्या शब्दाने माझ्या व माझ्या भावंडांच्या जीवनात ६ दशकां पासून गारूड घातले होते . शुक्रवारी भल्या पहाटे हे दैवी शब्द आमुच्या जीवनातून कायमचे दुर गेले . ” माँ के पैरो तले जन्नत होती है “ असे आयुष्यभर ऐकत आलो होतो, ही जन्नतची हकदार असणारी माझी, माझ्या भावडांची माँ , रशिदा पापामियाँ खाटीक ही कायमचीच अनंतात विलीन झाली . वडिलांच्या जाण्याने अर्धे मोडून पडलेलो आम्ही भावंडे , आईच्या जाण्याने पुरते उध्वस्त झालो आहोत .
शद्दो, अनो, जुल्ले, बंडे या शब्दाने आम्हां भावडांना मारली जाणारी हाक हमेशा हमेशा साठी बंद झाली . माझ्या आईला पहिले अपत्य मुलगी व्हावी असे वाटत असे . मात्र माझ्या जन्माने थोड्याशा निराश झालेल्या माझ्या माँ ने माझे नाव जरी सादिक ठेवले असले तरी मुलीचे नाव असलेल्या शद्दो याच नावाने आयुष्यभर मला पुकारले, बोलावले . क्वचित प्रसंगीच ती मला सादिक म्हणत असे . दुसऱ्या वेळी, माझा भाऊ अनिस च्या जन्माने पुन्हा दिग्मुढ झालेल्या माझ्या आईने त्याला ही मुलीचे नाव असलेल्या अनो या नावानेच सदैव पुकारून आम्हा दोघा मुलांच्या मध्ये, मुलींचे प्रेम मिळविण्याचा ती नेहमी प्रयत्न करत असे .
नंतरची जन्मलेली दोन्ही अपत्ये मुलीच ( जुलेखा, फरिदा ) झाल्याने अतिव आनंद झालेल्या माझ्या माँ ने आम्हां दोघा मुलांना मरेपर्यत मुलीच्याच ( शद्दो – अनो ) नावाने हाक मारणे सोडले नाही . आम्ही दोघे भाऊ चार पाच वर्षाचे होईपर्यंत माझी आई आम्हां दोघांना प्रसंगी मुली सारखे कपडे घालणे, पैजण घालणे, वेणी घालणे, स्नो, पावडर, काजळ वगैरे सोपस्कर करत सजवत असे . त्यात तिला मनस्वी आनंद व्हायचा . हे तीने आमच्या कळत्या वयात सांगीतल्याने आम्ही भावंडे विस्मयचकीत होवून जायचो .
माझे आजोबा आब्बास बापू खाटीक यांना दोन सख्या बहिणी होत्या . एक जमालबी मोतीलाल खाटीक पंढरपूर आणि दुसरी न्यामतबी चाँद पटेल सांगली , या दोघींचीही लग्ने १९३३ च्या आसपास झालेली . आटपाडी हे माझ्या आईचे एकप्रकारे आजोळच होते . माझे पंढरपूर आजोळचे आजोबा ( नाना ) मोतीलाल चंदुलाल खाटीक यांची पहिली पत्नी जमालबी ही माझ्या वडिलांची सख्खी आत्या, माझ्या आजोबांची सख्खी बहीण . बाळंतपणातच तिचा आणि तिच्या मुलाचा आटपाडीतच मृत्यू झालेला . त्यानंतर माझ्या नानांनी ( पंढरपूर ) दुसरे लग्न सोलापूरच्या जैनब नावच्या माझ्या नानीशी केले .
त्यांना झालेल्या एकूण ८ अपत्यात माझी आई एकमेव मुलगी होती . माझ्या आईची आटपाडीची पहिली आई जरी वारली असली तरी माझ्या आईचे सर्व कुटूंब नेहमीच आटपाडीला येत जात असे . यातूनच १९५८ साली माझ्या सख्ख्या आत्या हुसेनबी यांची माझे थोरले मामा इलाही मोतीलाल खाटीक यांच्या सोयरीक झाली . त्यानंतर १९६५ साली माझ्या आईचे, माझ्या वडिलांशी लग्न झाले . एकुण अपत्यात एकमेव असलेल्या माझे आईचे संगोपन खुप लाडाकोडात, श्रीमंतीत झालेले . मध्यवस्तीतल्या भल्या मोठ्या वाड्यात लहानाची मोठी झालेल्या माझ्या आईने, बुरखा आणि कोणत्या तरी स्त्रीच्या अथवा आई, वडिल, भावडांच्या साथ संगती शिवाय बाहेरचे जग कधी पाहिले नव्हते . इकडे आटपाडीला मात्र कमाल दारीद्रयाशी झुंजणारा माझा परिवार . आजोबा आब्बास बापू खाटीक, आजी रोशनबी आब्बास खाटीक, माझे वडिल पापामियाँ आब्बास खाटीक, लहान चुलते दिलावर आब्बास खाटीक, आत्त्या अनुक्रमे, हसमतबी दादा खाटीक कोन्हेरी सोलापूर, हुसेनबी इलाही खाटीक पंढरपुर सोलापूर , खातुनबी महिबूब रतनपारखे विजापूर आणि मुमताज उर्फ बाई सय्यदमियाँ कुरेशी मुंबई अशा आठ जणांच्या माझ्या परिवाराच्या बुजुर्गांनी वाट्याचे मटन विक्री, रोजंदारी पासून हमाली पर्यतच्या प्रचंड कष्ट , खडतर वाटचाल, ध्येयासक्त भूमिकेने मान, अपमान, उपेक्षा, पराकोटीची गरीबी, समोर येईल त्या प्रसंगाशी, जीवघेणा संघर्ष करत माझ्या घराला चार चौघात नावाजले जाणारे घरपण आणले होते .
दारूण, भीषण अवस्थेतल्या माझ्या परिवारात माझ्या आईच्या येण्याने माझ्या घराला हळूहळू गतीशिलता प्राप्त झाली . माझ्या सर्वच नातलगांची प्राणप्रिय सुन – लेक बनलेल्या माझ्या आईने घरातल्या सर्व व्यवस्थांवर आपला जम बसविला . प्रचंड कष्टणाऱ्या माझ्या सर्व परिवारात, उच्च श्रीमंतीत वाढलेल्या माझ्या आईने, छप्पराच्या – गळक्या पतऱ्याच्या घरातले रहाणे, शेणा – मातीने सारवणे, जात्यावर दळणे, धुणी भांडी करण्याबरोबच कोणत्याही कामाला दुय्यम न समजता, चुलीवर स्वयंपाक करण्याबरोबर वडिलांच्या पारंपारीक मटन, अंडी, चिकन विक्री व्यवसाय करण्यात स्वतःला जमवून घेतले . आमच्या लहानपणी मटन दुकानात, मटन कापणारी, तोडून वजनावर विकणारी माझी आई त्या काळातले (१९७०) मोठे आश्चर्य होते . महाराष्ट्रात अथवा देशातही कदाचित हे एकमेव उदाहरण असू शकेल . तिची गात्रे जोपर्यत चांगली होती तोपर्यत माझ्या आईने ( २०१० ) या व्यवसायात स्वतः ला झोकून दिले होते .
वडिलांचा फाटका प्रपंच सांभाळतांना अन्यायाविरुद्ध उसळून उठणारी माझी आई मर्दानी रूप धारण करत असे . पाण्यासारखा स्वच्छ, पारदर्शक, निर्मळ, स्वभाव असणाऱ्या माझ्या वडिलांनी नेहमी पडती भूमिका घेत अन्याय, अत्याचार , त्रास , देणाऱ्यांशी गोडी गुलाबीने सुसंवाद साधला . याउलट माझ्या आईचा स्वभाव होता . चांगल्यासाठी, गोरगरीबांसाठी मायेने उभे राहणारी माझी आई , प्रत्येक आडदांड , उन्मत्त, अन्यायी, अत्याचारी , फुकटखावू, उधारी बुडवे यांच्या विरुद्ध कंबर कसून उभी रहायची . सडेतोड, रोखठोक बोलण्याने पुढच्याची तमा बाळगायची नाही .
त्रास देणारा उच्च पदस्थ असो अथवा मोठ्या हुद्यावरील असो , माझी आई , जान गई तो बेहत्तर, पर जुल्म नही सहूँगी ! या भावनेने ती संघर्षाला सामोरी जायची . यात तिच्या सदगुणांचाच विजय व्हायचा . माझे आजोबा आब्बास बापू खाटीक यांना व माझ्या परिवारातल्या सर्वांना माझी आई नाझ – गौरव वाटायची . आणि आई वडिल यांच्या याच ध्येयवेड्या शिकवणीतून आम्ही सर्व भावंडे घडलो . माझ्या पत्रकारीतेल्या कणखरपणा बरोबरच माझ्यातल्या अनेक गुण वैशिष्ट्यांची जडणघडण माझे वडिल,आई यांच्यामुळेच झाली होती .
त्यातूनच मी व माझी भावंडे अन्यायाला प्रतिकार करणारे, सामान्यांशी साथ संगत करणारे घडलो . अन्याय अत्याचारा विरुद्ध लढायचे, चांगल्या प्रत्येकाचा गौरव करायचा, गरीबांमध्ये, सामान्यांमध्ये, माणूसकी पेरायची, हाच जीवनाचा मंत्र बनविणाऱ्या माझे आई – वडिल यांच्यासह घरातल्या सर्वांनी सर्व जाती, जमाती, धर्माचे लोक सदैव आपलेच भाऊबंद मानले होते .
आटपाडीचे एस . टी . स्टॅन्ड झाल्यानंतर सायंकाळी ६ नंतर तालुक्यातील अनेक गावांना जायला वाहन नसायचे . अशा स्थितीत अनेक परिचितांना माझे घर आसरा व्हायचे . जेवू खावू घालण्यापासुन चहा पाणी सर्व सोपस्करां नंतर सकाळी हे बांधव आपल्या गावी जायचे .
रात्री ९ नंतर एस . टी . घेऊन येणारे अनेक कंडक्टर , ड्रायव्हर, उशीरा कामावर येणारे मेकॅनिक यांच्या जेवणाची सोय माझ्या परिवाराने शेकडो वेळा करून दिल्याचे आजही मला स्मरते . रात्री १० नंतर स्वयंपाक करून दारी आलेल्या प्रत्येकाला जेवू घालण्याऱ्या माझ्या आईने, माझ्या वडिलांच्यातल्या इन्सानियतला नेहमीच साथ दिली, प्राधान्य दिले . दर दिवशी ड्यूटीवर जाणाऱ्या या एस . टी . तील कर्मचारी बांधवांना किरकोळ खर्चासाठी रोख पैसे देणे, मटन , अंडी, चिकन पुरवणे, काही काळानंतर सुरू केलेल्या आमच्या भारतीय भोजनालयात उधारीवर जेवण देणे . आणि नंतर ७ तारखेला म्हणजे त्यांच्या पगारा दिवशी त्या बांधवांकडून घरी आल्यावरच पैसे स्विकारणे, असा शिरस्ता अनेक वर्षे सुरू होता . खरसुंडीच्या यात्रा, बाजार दिवशी आणि पुढे आठवड्यातील अन्य काही दिवशी तेथे लावल्या जाणाऱ्या मटनाच्या दुकानाच्या ५५ वर्षाच्या इतिहासात माझ्या आईनेही आम्हां भावंडा समवेत १५ वर्षे खरसुंडीच्या दुकान साठी खर्ची घातली आहेत .
गल्लीतल्या अनेक मुलीसाठी नेहमीच आई झालेल्या माझ्या आईने शेकडो परिवारातल्या पोरी बाळींना आपलेसे केले होते . तिच्या मृत्युनंतर धाय मोकलत आलेल्या असंख्य लेकी बाळीने फोडलेल्या हंबरड्यातून याचा प्रत्यय आला .
प्रत्येकाच्या सुख दु : खात धावून जाणारी माझी आई , माझ्या वडिलांसारखी दानशुर, कनवाळू होती . गरीबीशी झुंजणाऱ्या प्रत्येका बरोबर, घरी दारी आलेल्या पै पाहुणे, अगदी मागतकऱ्या पर्यत सदैव तीने मदतीचा हाथ पुढे केला . आजाऱ्यांची सेवा सुश्रुषा करणे, त्यांना गोडधोड देणे, कपडालत्या पासून प्रसंगी आर्थिक मदत करणे, अनेकांच्या अनेक संकटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, अनेकांची लग्ने जमविणे, मुंज, लग्न समारंभ सुख, दुःखात सहभागी होणारे माझे आई वडिल खरोखरच सहृदयी होते .
शनिवारच्या बाजारातून माळवे, धान्य, फळाफळावळ, आणताना वडिलांना सोबत दोन चार माणसे आणि भल्या मोठया आठ दहा पिशव्या पुरायच्या नाहीत . यातला निम्मा अधिक बाजार अनेकांना वाटण्यातच जायचा . आपल्या बरोबर भिन्न जाती धर्मांच्या सर्वां समवेत जेवताना माझ्या आई वडिल यांना मोठा आनंद मिळायचा . दारी आलेल्या प्रत्येकाला अर्धी चतकोर देणाऱ्या या माझ्या आत्म्यांनी माणुसकीचा धर्म सदैव जोपासला .
१९७५ च्या दरम्यान सुरू केलेल्या पीठाच्या गिरणीच्या माध्यमातून आटपाडी व लगतच्या अनेक गावच्या शेकडो परिवारांशी जवळीक साधण्यात माझे माता पिता यशस्वी झाले . शेळ्या मेंढ्याचे आठवड्यांचे बाजार, वार्षीक यात्रा, जत्रा, उरूस वगैरेतून वडिलांनी शेकडों लोकांच्या जवळकीची मोठी श्रीमंती मिळविली होती आणि वडिलांच्या या श्रीमंतीला जपण्याचे काम आईसह परिवारातला प्रत्येक जण करायचा . उपेक्षित, वंचित, गरीब, अडाणी, अगदी दिव्यांगा बरोबरच समाजातला सर्व पीडीत वर्ग आमच्या परिवाराचा जणू घटकच असायचा . इतके निर्व्याज, निष्कलंक, जीवपाड, प्रेम , सदिच्छा, सदभावना माझे आई, वडिल या सर्वांना द्यायचे . नमाज, रोजे, सण, उत्सव इतर सर्व धार्मिक सोपस्कर करणारी माझी आई , परदेशी एकटी जावून उमरा करणारी माझ्या परिवारातील एकमेव सदस्य होती .
भारती हॉस्पीटल मध्ये माझ्या हृदया साठीची एंजोप्लास्टी करण्याच्या दिवशीच रडत रडत विमानाने उमरा करण्यासाठी मक्का – मदिना येथे गेलेल्या माझ्या आईने माझ्या सलामतीसाठी लाख वेळा अल्लाहतालाचा धावा केला होता . कोरोणाच्या मृत्यूशय्ये वरून मला माघारी आणण्यात अनेकांच्या दुवाँ आशीर्वादा बरोबरच माझी आई, माझी पत्नी आणि परिवारातल्या सर्वांची प्रार्थना दुवाँच मला वाचविण्यात यशस्वी झाली होती . वयाच्या साठीकडे झुकत चाललेल्या मला , मी रात्री घरी येईपर्यत आईला झोप यायची नाही . दिवसभर तु कुठेही जा पण, रात्री घरी ये, हाच तिचा घोषा असायचा . तिच्या बेड समोर मी झोपलेला पाहिल्यावरच ती झोपत असे .
तिचे चालणे, उठणे, बसणे असह्य होत चालले तरी तिला आमच्या सर्वांच्या सलामतीत सुकून मिळायचा. आम्हा भावडां समवेत आमच्या बायका, मुले, नातवंडे, जावई, नात सूना, परतवंडे यांच्या साठी ती तीळ तीळ तुटायची . आयुष्यभर परिवारासाठी समर्पित झालेला माझा लहान भाऊ अनिस आणि माझ्या दोन बहिणी यांच्यासाठी सदैव दुवाँ मागत रहायची . नातू झिशान, नातसून फरहीन यांच्यासाठी ती सतत घोषा करायची . घरातल्या चिल्या पिल्यां पासून घरातल्या सर्वांची शेजा पाजाऱ्यांची, पै – पाहुण्यांची ख्याली खुशालीची चौकशी करीतच माझ्या आईने हे जग सोडले .
पाच वर्षापूर्वी वडिलांच्या जाण्याने अर्धे मोडून पडलेलो आम्ही सर्वजण , मात्र आईच्या जाण्याने पुरते उध्वस्त झालो आहोत . माझे आई वडिल, माझ्या परिवारातल्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या ज्ञात – अज्ञात प्रत्येक बंधू भगिनी युवक वडिलधारी मंडळी कडून नम्रपणे एवढीच अपेक्षा करतो की , माझे दिवंगत वडील, आई, आजी, आजोबा वगैरे दिवंगतांना जन्नत मध्ये स्थान मिळावे, त्यांच्या आत्म्यांस सुकून, शांती मिळावी यासाठी सर्वांनी दुवाँ, प्रार्थना करावी, आशीर्वाद, सदिच्छा, सद्भावना, प्रेम द्यावे .
माँ तुझे सलाम !
जी जी तुम्हे सलाम !!
अल्लाहतालाको प्यारे हुये सभी भाई बहनो बुजुर्गोको सलाम !!!
Discussion about this post