रांजणगाव गणपती
प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
स्वीप पुणे मिशन डिस्टीक्शन अंतर्गत आज शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथील नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी ‘मतदान संकल्प रॅली’ काढली. ही रॅली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री लालासाहेब जाधव व पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. ‘मतदार राजा जागा हो,
लोकशाहीचा धागा हो’, ‘भारत भाग्य विधाता, मी आहे सजग मतदाता’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढापुरी च्या वतीने लालासाहेब जाधव यांच्या संकल्पनेतून ‘वोटर सेल्फी झोन’ तयार करण्यात येणार आहे. मतदान वाढविण्यासाठी पालक व महिला मेळाव्यातून प्रबोधन करण्यात आले यासाठी मतदान जनजागृती रॅलीही काढण्यात आली. सदर मतदारांचा व पालकांचा व्हाट्सअप ग्रुप ही तयार करण्यात आला आहे त्यातून त्यांना वेळोवेळी मेसेज ही पाठवला जातो.
पथकाच्या वतीने ‘माझं मत, माझा अधिकार, माझं कर्तव्य’ ह्या पथनाट्यद्वारेही जनजागृती करण्यात आली. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बूथ लेवल अवरनेस ग्रुपच्या वतीने करण्यात आले. मतदान जनजागृतीसाठी शाळेत निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धा याचेही आयोजन करण्यात आले यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझे मत, माझा अधिकार असून
मतदान करणे हे आमचे कर्तव्य असून मी २० नोव्हेंबरला आमच्या कुटुंबासह मतदान करणार, व सर्वांना याविषयी माहिती सांगणार अशा आशयाचे ‘संकल्प पत्र’ आपल्या कुटूंबियांकडून स्वाक्षरी घेऊन लिहून घेतले जात आहे . मतदान केंद्रावर दिव्यांग, वयस्कर, आजारी मतदारांना मदत करण्यासाठी स्काऊट पथकाचे स्वयं सेवक तसेच महिलांसाठी स्वतंत्र बालसंगोपन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Discussion about this post