
शहरात मागील काही
दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या, अशातच शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या, तर काहींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणत तीन दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे हे चोरटे दुचाकीवर नजर ठेवून असतात.दुचाकीला चावी लागलेली दिसताच ते दुचाकी घेऊन रफूचक्कर होतात, त्यामुळे नागरिकांनी दुचाकीची चावी काढावी, अन्यथा दुचाकी चोरी होऊ शकते, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
आशिष देवचंद मोहोड रा. कारला रोड यांची एम.एच. ३२ एयू ११०७ क्रमांकाची दुचाकी पानटपरीवरुन चोरी गेली होती. त्यांनी दुचाकीला चावी लावून ठेवली होती. तसेच नितीन प्रल्हाद पडोळे रा. रामनगर यांची एमएच. ३२ एएन. ५५४७ क्रमांकाची दुचाकी राधा मेडिकल समोरून चोरून नेली होती. तसेच रितेश मांडवीया रा.झेंडा चौक यांच्या दुकानासमोरून त्यांची तसेच निक्की तिरथ लुडेल यांचीही एमएच ३२. एपी ८०१३ क्रमांकाची दुचाकी चोरून नेली होती. विशेष म्हणजे या सर्वांनी दुचाकीलाच चावी लावून ठेवली होती. आणि रेकी करत असलेल्या चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.
यासर्व घटनांची शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गोपनीय माहितीवरून सर्व दुचाकी आरोपी ऋषिकेश गणेश मानकर (२० रा. कांद्री, जि. नागपूर) याच्याकडे असल्याचे समजले. पोलिस पथकाने तत्काळ कांद्री गाव गाठून आरोपीस अटक केली. तसेच दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नयन राजेश निंबाळकर (२१ रा. आनंदनगर, वर्धा) याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवताच चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, प्रशांत वंजारी, किशोर पाटील, नरेंद्र कांबळे, वैभव जाधव, श्रावण पवार, योगेश ब्राह्मण यांनी केली.
Discussion about this post