भोकर प्रतिनिधी राजकुमार पांचाळ यांना
दि.23 आक्टों. भोकर येथील संत सेवालाल महाराज स्मारक व सभागृहाच्या बांधकामाविरुद्धचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावले असून, हे स्मारक नगरपरिषदेची मालकी असलेल्या भूखंडाच्या हद्दीत उभारले जात असल्याचा निर्वाळा दिला आहे. भोकर येथे गेल्या १७ ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या माध्यमातून नियोजित श्री संत सेवालाल महाराज स्मारक तथा सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आ. बाबुसिंग महाराज, दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली) आदींच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले होते.
सुमारे ७ कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या स्मारकाचे बांधकामही सुरु झाले आहे. बंजारा समाजाची एक महत्वपूर्ण मागणी मार्गी लागत असताना शेख इनायात शेख फरीद आणि महम्मद अन्बर शेख फरीद यांनी सदरहू स्मारक आपल्या मालकीच्या जागेत होत असल्याचा दावा करून
स्मारकाचे भूमिपूजन रोखण्याची मागणी करणारे अपिल भोकर येथील दिवाणी न्यायाधीश बरिष्ठ स्तर अ. प्र. कराड यांच्या न्यायालयात दाखल केले होते. मात्र, हे अपिल त्यांनी फेटाळून लावले. त्याविरूद्ध अपिलकर्त्यांनी दिवाणी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. परंतु, जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवून वादींचे अपिल नामंजूर केली आहे. संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाविरुद्धच्या या अपिलावरील सुनावणीत भोकर नगरपरिषदेने जागेचा मोजणी अहवाल व इतर दस्तावेजांच्या आधारे हे : स्मारक आपल्या मालकीच्या हद्दीत असल्याचे सिद्ध केल्याने जिल्हा न्यायाधीशांनी हे अपिल फेटाळून लावले आहे. या प्रकरणामध्ये भोकर नगर परिषदेच्या वतीने अँड. शिवाजी कदम यांनी बाजू मांडली.

Discussion about this post