गिरीश महाजन यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल; मोठा जनसमुदाय आणि शक्तीप्रदर्शनजामनेर – विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नामदार गिरीश महाजन यांनी आज मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी, पाचोरा रोडवरील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे, जामनेर माजी नगराध्यक्षा साधना महाजन,खासदार स्मिता वाघ, डॉ .उल्हास पाटील , राजू मामा भोळे, संजय गरुड, डॉ. सागर गरुड, गोविंद अग्रवाल, चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, रवींद्र झाल्टे, दीपक पाटील, दीपक तायडे, अरविंद देशमुख,आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर गिरीश महाजन यांनी जनतेशी संवाद साधला आणि सांगितले की, सातव्यांदा मला पक्षाने संधी दिली असून, या विश्वासाबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.महाजन यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जामनेर शहर व तालुक्यातील विविध विकासकामांबद्दल बोलताना जाहीर विश्वास व्यक्त केला की, जनता पुन्हा एकदा मला विजयी करून सेवा करण्याची संधी देईल. विरोधकांवर टीका करत त्यांनी म्हटले की, विरोधकांकडे उमेदवार नव्हता आमच्यातीलच एक व्यक्तीला त्यांनी फोडून उमेदवारी दिली. आज तेच लोक आम्हाला विकासावर प्रश्न विचारत आहेत.यावेळी ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाजन यांनी त्यांच्या मागील सहा निवडणुकांमध्ये जामनेरकरांनी भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या विश्वासामुळेच मी जामनेरकरांच्या सेवेस तत्पर राहू शकलो, असे ते म्हणाले.महाजन यांचा विकास कार्याबद्दलचा अभिमान स्पष्ट करत, त्यांनी म्हटले की, गेल्या तीस वर्षांत जामनेरचा झालेला विकास आणि त्यात आपला हातभार असणे, याचा आनंद मोठा वाटतो.या उमेदवारी अर्जाच्या दाखल कार्यक्रमाने संपूर्ण जामनेर तालुक्यात राजकीय वातावरण तापवले असून, महाजन यांचे नेतृत्व आणि विकासात्मक कामांवर नागरिकांचा ठाम विश्वास दिसून येत आहे.
Discussion about this post