ईश्वरावर श्रद्धा ठेवून विधानसभा निवडणूक लढवायची हे एकमेव स्वप्न उराशी बाळगून खेड तालुक्यात गेल्या चार – पाच वर्षांपासून अफाट मेहनत घेणारं नाव म्हणजे बाबाजी रामचंद्र काळे. ही लढाई छोटी नाही, नुसतं लढायचं नाही तर या लढाईत आपल्याला टीकायचं आहे. हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे बाबाजी काळे.
आजच्या काळात कोणतीही निवडणूक लढणे म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी करावी लागते. परंतु याला अपवाद ठरले बाबाजी काळे. गरज ओळखून खिसा रिकामा करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ज्या बैलगाडा मालकांनी, शिवसैनिकांनी २००४ साली आढळराव पाटील यांना खासदार केलं, त्याच बैलगाडा मालकांनी, शिवसैनिकांनी आज बाबाजी काळे यांना आमदार केलं. केवळ बैलगाडा मालकच नाही तर या विजयात महिला, तरुण, शेतकरी, जेष्ठ विशेषतः वारकरी मोठ्या हिरहिरीने सहभागी झाले.
ही लढाई सहज सोपी नव्हती, समोर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत होता, तर इकडे प्रचाराच्या वेळी गावभेट दौरा सुरू करण्याच्या अगोदर सकाळी पैशांची जुळवाजुळव करून पुढे जावं लागत होतं. माझ्या सारखा राजकीय घडामोडींचा विद्यार्थी यात एकच निरीक्षण नोंदवू शकतो की, बाबाजी काळे यांनी ही केवळ निवडणूक ही ईश्वरावर श्रद्धा ठेवून ईच्छा शक्तीच्या जोरावर लढली आणि जिंकली.
या लढाईत मोठा संघर्ष होता. एका बाजूला ३० वर्षांचा विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेला नेता समोर होता, तर एका बाजूला उमेदवारीसाठी रांग लागली होती. या रांगेत सगळेच नामांकित होते, पुरून उरणारे होते. परंतु मी लढू शकतो, मी जिंकू शकतो हा आत्मविश्वास केवळ गेल्या काही वर्षांपासून करत असलेल्या कामाच्या जोरावर होता.
बाबाजी काळे आर्थिक सक्षम नाही केवळ हा आणि हाच मुद्दा त्यांच्या संपूर्ण निवडणुकीत प्रमुख ठरला. उमेदवारी मिळताना देखील याच निकषावर संघर्ष झाला तर निवडणूकीत उतरल्यावर देखील टीकेचा मुद्दा हाच राहिला.
व्यवसायातील उधारी, माळकरी पासून तर सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाचे हिशोब काढले गेले. केवळ आणि केवळ एकच मुद्दा होता तो म्हणजे आर्थिक, आर्थिक आणि आर्थिक. या सगळ्यात बाबाजी काळे आपल्या सहकाऱ्यांना भर सभेत एकच विश्वास देत होते. मित्रांनो समोरच्या उमेदवारापेक्षा जास्त पैसे तर नक्कीच नाही, परंतु या लढाईत जे जे करावं लागेल ते ते मी करण्याची तयारी ठेवली आहे. तेवढी माझी ताकद आहे, तुमची मान शरमेने खाली जाणार नाही ही माझी जबाबदारी आहे. यातूनही पक्ष, आणि तालुक्यातील विविध भागातील नेत्यांची साथ मोठी होती. अनेकजण भावासारखे पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यातल्या त्यात सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वीकारली होती याचं कारण बाबाजी काळे यांचा चांगुलपणा.
वाट्टेल ते करण्याची क्षमता सोबत असलेल्या सहकाऱ्यांची होती. त्याग करून अनेकांनी बाबाजी काळे यांना सहकार्य केलं. त्या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सामान्य माणूस सांगत होता आम्हाला एकास एक निवडणूक द्या निकाल आम्ही तुमच्या पदरात भरभरून टाकतो. सामान्य माणसाच्या हाकेला ओव देणाऱ्या नेत्यांना तालुका समजला आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना बाबाजी काळे यांच्यातला सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव समजला म्हणून बाबाजी काळे यांना पसंती मिळाली.
सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली, जाईल तिथे विश्वास होता. संपूर्ण निवडणूक प्रचार काळात मला धाकधूक कुठेच जाणवली नाही. कारण समोरून टीका करण्याचा स्थर पाहिला तर या बाजूने वेगळं काही करण्याची आवश्यक नव्हती. तरीही उत्साही कार्यकर्ते, आक्रमक सहकारी या सगळ्यांना थोपविणे ही देखील कसरत होती.
नवखा उमेदवार, माळकरी म्हणून हिणवले. एवढंच नाही तर सय्यम ढासळला पाहिजे यासाठी देखील प्रयत्न झाला. १५ वर्षांच्या साम्राज्याला उलथून टाकण्यासाठी सामान्य माणूस पुढे आला. अप्रत्यक्ष मदतीचा ओघ सुरू होता. प्रत्यक्ष आशिर्वाद मिळत होते. ही लढाई जिंकण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली.
या प्रक्रियेत अनेक नावं अशी आहेत की, जे निस्वार्थी भावनेने आपल्या नेत्यावर, आपल्या मित्रावर संकट आहे हे ओळखून दूर करण्यासाठी लढत होती. मी आवर्जून उल्लेख करेल की, फोटोत न दिसणारे किंवा कमी दिसणारे पाठीमागे पडद्याच्या मागे काम करणारी अनेक डोकी आणि अनेक हात हेच खरे विजयाचे शिल्पकार आहेत.
खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघातील विजयाचे निरीक्षण फक्त एवढेच होईल की, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीची इच्छाशक्ती, निस्वार्थी भावना, ईश्वरावरील श्रद्धा, सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची हतोटी, सय्यम, सामान्य माणसाचा आवाज ओळखून पुढे जाणे म्हणजे विजय….!
आणि याला पात्र ठरले ते बाबाजी रामचंद्र काळे…!
हे माझे व्यक्तिगत मत आहे – रोहिदास भाऊ राक्षे
Discussion about this post