परंडा तालुका प्रतिनिधी: दत्तात्रय खोबरे
आत्मसूर्य महिला बहुउद्देशीय संस्था परंडा या संस्थेच्या वतीने हॅपी क्लब ची स्थापना करण्यात आली असून सदस्या श्रीमती मिनाक्षी नकाते यांच्या हस्ते आज हॅप्पी क्लब संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला.
हल्ली घराघरांतून एकच ऐकायला मिळते की , मुले बिघडली आहेत,आमचे काही ऐकत नाहीत,ती स्वच्छंदी,विलासी,आळसी , बेपर्वा बनली आहेत, गप्प गप्प राहतात त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नाही,अतीलाडाने ती पार बिघडून गेली आहेत. छोट्या छोट्या गोष्टीचा राग धरून टोकाचं पाऊल उचलतात. या सर्व गोष्टी का घडतात? याची कारणं आणि त्यावरील उपाय शोधण्याच एक माध्यम म्हणजे हॅप्पी क्लब आहे.
या क्लबच्या माध्यमातून मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे. त्यांच्या मध्ये सकारात्मकता वृद्धिंगत करणे आणि त्यांच्या मनातील भावनांना व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ त्यांना नक्कीच मदत करेल असा विश्वास श्रीम. नकाते यांनी व्यक्त केला.आजच्या मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे त्यामुळे वेगवेगळे विकार मुलांना होताना दिसतात, मुल एकलकोंडी होत चालली आहेत, त्यातून नैराश्य निर्माण होते आणि या नैराश्यातून चुकीचे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे गरज आहे व्यक्त होण्याची, त्यासाठी त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आणि आजच्या काळाची हीच गरज लक्षात घेऊन हॅप्पी क्लब ची स्थापना करण्यात आली आहे.
या क्लबचा आणखी एक हेतू म्हणजे त्यांना अभ्यासाची व स्पर्धा परीक्षा ची प्रेरणा मिळावी म्हणून मराठी अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावातील यशस्वी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष भेटी या गोष्टी मुलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच क्षेत्रभेट पिकनिक यातून मुलांचे मनोरंजन सुद्धा करण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींमुळे निश्चितच यामध्ये सकारात्मक बदल होतील.
हॅप्पी क्लबच्या माध्यमातून अभ्यासाशिवाय गोष्टी, गाणी, गप्पा , अधिकारी भेटी, शैक्षणिक सहल, वेगवेगळे आनंद देणारे, आनंद निर्माण करणारे उपक्रम राबवले जाणार आहेत. सामाजिक दायित्व म्हणून हॅप्पी क्लब हा सर्वांसाठी मोफत चालविला जाणार आहे. याचा सर्वांनी फायदा करून घ्यावाअसे आवाहन मिनाक्षी नकाते यांनी केले.
यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे बाळासाहेब घोगरे ,राज क्लासचे सुजित देशमुख , उपक्रमशील शिक्षक महेश शिंदे , पत्रकार प्रकाश काशीद, मुख्याध्यापक गणेश विटकर, मुख्याध्यापिका सुरेखा भोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मला विटकर होत्या. तसेच विद्यार्थी व पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.शेवटी मंजुषा फडके यांनी सर्वांचे आभार मानले.
Discussion about this post