सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – १३.०३.२०२५
राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री ना. दत्तामामा भरणे आणि माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या लोहार समाजाच्या सर्व मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरात लवकर बैठक लावून सोडविण्याच्या दिलेल्या ठोस आश्वासनानंतर व लोहार समाज बांधवांच्या आग्रहाखातर लोहार समाजाचे नेते दादासाहेब कळसाईत यांनी गेल्या दहा दिवसापासून सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुहास पाटील यांनी आंदोलन सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत यशस्वी मध्यस्थी करत दादासाहेब कळसाईत यांना आमरण उपोषणापासून परावृत्त केले. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री, उपोषणस्थळी फोनवरून संभाषण करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे ठोस आश्वासन देणारे राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तामामा भरणे आणि विधान भवनात लोहार समाजाचे प्रश्न मांडणारे माजी मंत्री आ.सदाभाऊ खोत आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते या सर्वांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून आंदोलन स्थगित करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून माझा लोहार समाज आज हे पारतंत्र्यात जगत आहे. एका आंदोलनाच्या ठिणगीने संपूर्ण राज्यातल्या लोहार समाज जागा होऊन लढतो आहे. संयमी असणारा लोहार समाज तितकाच लढाऊ असल्याचे या आंदोलनातून दिसले. क्रीडामंत्री ना.दत्तामामा भरणे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या आश्वासनानंतर तसेच माझ्या समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण स्थगित केले आहे, थांबवले नाही. आश्वासनपूर्ती न झाल्यास यापुढे मोठे आंदोलन करू.
दादासाहेब कळसाईत
उपोषणकर्ते
आंदोलनाच्या नवव्या दिवशी देखील शासनाने दखल घेतली नसल्यामुळे टेंभुर्णी येथे सोलापूर-पुणे महामार्गावर लोहार समाजाच्या वतीने रस्ता रोको करून चक्काजाम करत लोहार समाजाने निषेध नोंदविला. रास्ता रोको आंदोलनास तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील मंडलाधिकारी भगवान मुंडे, तलाठी समाधान भुजबळ यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले.
आंदोलनादरम्यान सोलापूर जिल्ह्यात व तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लोहार समाजात एकजूट झाल्याचे चित्र दिसले. यामध्ये विश्वकर्मा लोहार संघटनेचे अध्यक्ष यशवंत कळसाईत, लोहार युवा मंडळाचे अध्यक्ष सुहास लोहार, सोलापूर लोहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महेश लोहार, लोहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, इंदापूरचे धनंजय थोरात पत्रकार धनंजय थोरात यांनी आंदोलनात पुढाकार घेऊन आंदोलन पुढे नेले. याशिवाय महाराष्ट्रातील जालना, कोल्हापूर, सांगली, सातारा इतर जिल्ह्यातील संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला. एकुणात लोहार समाजात झालेल्या पहिल्या आंदोलनात समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Discussion about this post