श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) प्रेमदास राठोड(8308410247). येथील तालुका कृषी अधिकारी हे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. किनवटचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे हे प्रभारी तालुका कृषी अधिकारी म्हणून इथला कारभार पाहत आहेत. कामाचा बोजा अधिक वाढल्याचा सबब पुढे करून त्यांनी या कार्यालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी व दौऱ्यावरील कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. परिणामी सज्जावर नाही, तर कार्यालयात तरी भेट होईल या अपेक्षेने तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना मात्र रित्या हातानेच घरी परतावे लागत आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे माहूर शहरापासून सुमारे दोन किमी अंतरावर आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी तिकडे फिरकतच नाहीत. त्याचा फायदा घेऊन कार्यालयीन कर्मचारी हे कार्यालया बाहेरच असतात, तर सज्जावरील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक हे दौऱ्यावर असल्याचे भासवून नेहमीच सुट्टीचा मनमुराद आनंद उपभोगतात, अशी ओरड शेतकऱ्यातून होत आहे.
सध्याला रब्बी हंगाम सुरु आहे, ढगाळ वातावरण व सकाळच्या वेळी धुकं पडत असल्याने तूर व हरभरा या पिकांवर अळीचा मोठा प्रादुर्भाव झालाआहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना धीर देणे गरजेचे झाले आहे. परंतु प्रभारी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांचे अक्षम्य दुर्लक्ष, कृषी सहाय्यक व कृषी सेवक सहा सहा महिने ग्रामीण भागात फिरकतच नसल्याने शेतकरी त्यांच्या मार्गदर्शना पासून वंचित राहत आहेत.
हरडफ सज्जाच्या कृषी सेवक व्ही. एम. तोडसाम ह्या पोळ्याला कीटकनाशक वाटप करण्यासाठी आल्या होत्या, त्यानंतर त्यांचे दर्शनच नाही अशी कैफियत बोंडगव्हाण येथील तरुण शेतकरी रवींद्र सुरेश रणवीर यांनी मांडली माहिती घेण्यासाठी कृषी कार्यालयात गेलो, परंतु माहिती देण्यास कुणीही पुढे येत नाही, बाहेर बसा असे सांगितल्याने कार्यालया बाहेर बसून आहोत अशी व्यथा मदनापुर येथील वयोवृद्ध शेतकरी उध्दव कचरू रणवीर यांनी मांडली.
Discussion about this post