समृद्ध शेती, सक्षम महिला: अन्नपूर्णा प्रकल्पाचा सुफळ संकल्प
कंसाई नेरोलॅक पेंटस लि. कंपनीचे सातत्यपूर्ण आर्थिक सहकार्य
चिपळूण :
दिशान्तर संस्थेच्या अन्नपूर्णा प्रकल्पातून शेतकरी महिलांचे सक्षमीकरण आणि त्यायोगे त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण यशस्वीपणे साध्य होत आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकरी महिलांना फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला कन्साई नेरोलॅक पेंट्स लि. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख, फॅक्टरी व्यवस्थापक जयवर्धन सर, लोटे येथील मनुष्यबळ व्यवस्थापक नंदन सुर्वे आणि दिशान्तर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जुवाड बेटावरील अन्नपूर्णा प्रकल्पातून महिलांनी शेतीचे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा यशस्वी मिलाफ साधला आहेच पण यासोबतच त्यांनी सुयोग्य व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य आत्मसात करून व्यक्ति विकासही साधला आहे असे देशमुख सर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या प्रसंगी शेतकरी महिलांनी आपल्या प्रगतीचा आलेख कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर सादर केला. यापुढील वाटचालीतही कंपनी शेतकरी महिलांना पाठिंबा देईल, असे आश्वासन नंदन सुर्वे यांनी दिले. जयवर्धन सर यांनी महिलांच्या प्रगतीचे आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे विशेष कौतुक केले.
महिला शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने मांडलेली मनोगते सर्वांना भावली. दिशान्तर संस्थेने उभी केलेली ही चळवळ जिल्ह्यातील शेतीला नवे आयाम देईल, असा विश्वास कंपनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विद्या माळी, किशोरी माळी आणि देविका माळी यांनी शेती गटांच्या वतीने आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव सीमा यादव यांनी केले, तर संस्थेच्या खजिनदार शर्वरी कुडाळकर यांनी कंपनी अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई आणि सावतामाळी शेतकरी स्वयंसहाय्यता गट तसेच त्यांचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.
Discussion about this post