
खरीप आणि रब्बी हंगामात पिकांच्या बाबतीत होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, कीड, रोगराई इत्यादींसारख्या जोखिमांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित करणे या उद्देशाने “प्रधानमंत्री पीक विमा योजना” लागू करण्यात आली.
२०२०-२१ च्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रामध्ये १.१९ कोटी शेतकरी बांधवांनी आपली ६४.८५ लाख हेक्टर जमीनीवरील पिके या विमा योजनेच्या माध्यमातून संरक्षित केली. या सर्वांनी विम्यापोटी विमा कंपन्यांकडे जो हप्ता भरला, त्याची एकूण रक्कम ५८०१ कोटी रुपये इतकी होती. त्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानामुळे ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला, त्या शेतकऱ्यांची एकूण संख्या १२.३० लाख इतकी होती आणि त्यांना भरपाईपोटी मिळालेली एकूण रक्कम ८२३ कोटी रुपये होती. म्हणजे विमा कंपन्यांकडे विम्यापोटी जमा झालेल्या ५८०१ कोटी रुपयांपैकी ८२३ कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्यांना वाटून टाकले आणि एका वर्षात ४९६९ कोटी रुपये इतका नफा मिळवला.
वरकरणी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र विमा कंपन्यांचाच त्याचा जास्त फायदा होत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी “भारतीय कृषी विमा कंपनी” ही एकच कंपनी असून इतर खाजगी विमा कंपन्या या तिच्याशी संलग्न करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांसाठी राज्यात विविध जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेल्या विमा कंपन्या पुढीलप्रमाणे :
१) भारतीय ऍक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – सोलापुर, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगाव, चंद्रपूर
२) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, परभणी, जालना, वाशीम, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, नागपूर
३) इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
४) एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि. – पुणे, रायगड, पालघर, औरंगाबाद, हिंगोली, धुळे, अकोला, भंडारा
५) बजाज अलयंन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – उस्मानाबाद
६) भारतीय कृषी विमा कंपनी – लातूर, बीड
या पीक विमा कंपन्या कुणाच्या मालकीच्या आहेत ते पाहू..
१) भारतीय ऍक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – राकेश मित्तल
२) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – अनिल अंबानी
३) इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – के.श्रीनिवास गौडा
४) एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि. – दीपक पारेख
५) बजाज अलयंन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – तपन सिंघेल
६) भारतीय कृषी विमा कंपनी – भारत सरकार
खाजगी विमा कंपन्यांनी नफा कमावण्यावर आक्षेप नाही, परंतु भरपाईसाठी दावा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अपात्र ठरवून जी नफेखोरी केली जात आहे त्याला आक्षेप आहे. शेतकऱ्यांनी जमा केलेल्या विमा हप्त्यातून केवळ १४% रक्कमेचा परतावा केला जात आहे, बाकीची ८६% रक्कम विमा कंपन्यांच्या घशात जात आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांमध्ये या खाजगी विमा कंपन्याही सहभागी आहेत. त्यांच्या नफेखोरीचे प्रमाण कमी करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीकविम्याचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. नाहीतर शेतकरी कंगाल आणि खाजगी पीकविमा कंपन्या मालामाल होत राहणार…
प्रल्हाद पाटील इंगोले यांनी या प्रश्ना बद्दल आवाज उठविला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन… आम्ही या लढाई मध्ये सोबत आहोत ..🙏💐
Discussion about this post